आर्यन खान तुरुंगात कसा राहायचा? राऊतांच्या 'नरकातील स्वर्ग'मध्ये शाहरुखच्या लेकाचाही उल्लेख
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 12:15 IST2025-05-23T12:15:10+5:302025-05-23T12:15:56+5:30
आर्यन खानच्या टी-शर्टचा किस्सा, राऊतांच्या पुस्तकात आर्यनबद्दल काय लिहिलं वाचा.

आर्यन खान तुरुंगात कसा राहायचा? राऊतांच्या 'नरकातील स्वर्ग'मध्ये शाहरुखच्या लेकाचाही उल्लेख
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांचं 'नरकातला स्वर्ग' हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. २०२२ साली ऑगस्ट महिन्यात त्यांना अटक झाली होती. ईडीच्या अटकेपासून ते १०० दिवस जेलमध्ये असताना आलेले अनुभव राऊतांनी त्यात लिहिले आहेत. याच पुस्तकात त्यांनी शाहरुख खानचा लेक आर्यन खानचाही (Aryan Khan) उल्लेख केला आहे. कारण संजय राऊतांच्या आधी आर्यन खानही त्याच तुरुंगात राहून आला होता. जेल प्रशासनाकडून ऐकलेले़ आर्यनचे काही किस्से त्यांनी पुस्तकात नमूद केले आहेत.
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला २०२१ साली ऑक्टोबर महिन्यात अटक झाली होती. कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्सप्रकरणी एनसीबीने त्याला अटक केली होती. तो २८ दिवस आर्थर रोड जेलमध्ये होता. आर्यन तुरुंगात कसा राहायचा आणि त्याचे इतर किस्से संजय राऊतांना 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकात लिहिले आहेत. ते लिहितात, "आर्यन खानकडे कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थ सापडले नव्हते. त्याने अशा पदार्थांचं सेवनही केलं नव्हतं हे तपासात समोर आलं होतं. पण पैसा आणि प्रसिद्धीच्या हव्यासाची कोणाची खाज म्हणून अशा अटका होतात. तो तुरुंगात असताना काही खातही नव्हता. मिळालं तर एखादं फळ खायचा आणि पाणी प्यायचा. तो तुरुंगात कोणाशी फारसं बोलायलाही जायचा नाही." त्याला तुरुंगात टाकलं, छळलं हे सगळं पैसे उकळण्यासाठीच केलं गेलं असा आरोपही त्यांनी पुस्तकातून केला आहे.
टी-शर्टचा किस्सा
आणखी एक किस्सा सांगताना ते लिहितात, "तुरुंगातील यार्डातील एक सहाय्यक एकदम ब्रँडेड टीशर्ट घालून जाताना दिसला. मी त्याला विचारलं, 'हा एकदम मस्त टीशर्ट घातल आहेस.'. त्यावर तो म्हणाला, "हो, मी १० नंबरमध्ये आर्यन खानसोबत होतो. त्याने जाताना मला हा टीशर्ट दिला."
राज कुंद्राचाही उल्लेख
संजय राऊतांनी पुस्तकात शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राबद्दलही लिहिलं आहे. ते लिहितात," राज कुंद्राला मुद्दामून जनरल यार्डात ठेवलं गेलं होतं. तो शेसव्वाशे कैद्यांसोबत राहिला होता. त्याला सवलती द्या म्हणून अनेकांनी प्रयत्न केले होते. पैसेही ऑफर करत होते पण आम्ही कोणालाच जुमानलं नाही असं बड्या अधिकाऱ्याने सांगितलं. पण मला ती सगळी थापेबाजीच वाटली. जेल पैशांवरच चालते आणि चालवलीही जाते यावर माझी श्रद्धा आहे."