War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
By देवेंद्र जाधव | Updated: August 14, 2025 17:52 IST2025-08-14T17:50:58+5:302025-08-14T17:52:57+5:30
'वॉर २' सिनेमा पाहण्याचा विचार करताय? थिएटरमध्ये सिनेमा पाहण्याआधी वाचा हा रिव्ह्यू

War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
एखादी कथा आपण मोठ्या पडद्यावर पाहत असतो. डोक्याला झिणझिण्या येणाऱ्या गोष्टी घडत असतात. तरीही पुढे काहीतरी चांगलं होईल अशी अपेक्षा असते. पण शेवटपर्यंत काहीच नीट घडत नाही आणि आपल्या सहनशक्तीचा अंत होतो. अशीच काहीशी अवस्था 'वॉर २'ची झाली आहे. अत्यंत उत्तम सिनेमाचा इतका वाईट सीक्वल दिग्दर्शक अयान मुखर्जीने बनवला आहे. सिनेमात भरमसाठ ॲक्शन आणि अतिशयोक्तीचा इतका कळस आहे की, एका क्षणी सर्व हास्यास्पद वाटतं. 'वॉर'च्या पहिल्या भागाने YRF साठी (यशराज फिल्मस) खऱ्या अर्थाने स्पाय युनिव्हर्सची सुरुवात केली. पण 'वॉर २' हा या युनिव्हर्समधील सर्वात कमकुवत सिनेमा आहे, हे खेदाने नमूद करावं लागेल.
कथानक:
'वॉर २'च्या कथेत सुरुवातीला दिसतं की, जपानसारख्या देशात एक कुख्यात गुंड त्याचा वाढदिवस साजरा करतो. अशातच तो गुंड आणि त्याच्या टोळीला संपवायला कबीर (हृतिक रोशन) तिथे येतो. पुढे कथानक फ्लॅशबॅकमध्ये जातं. कर्नल सुनील लुथ्रांची (आशुतोष राणा) मुलगी (कियारा अडवाणी) वायुसेना अधिकारी बनते. दरम्यान कबीर आता दहशतवादी संघटनांशी हात मिळवून वाईट कामं करताना दिसतो.
अशातच एका मिशनदरम्यान कर्नल लुथ्रा शहीद होतात. त्यांना मारण्यात कबीरचा हात आहे, हे सर्वांना कळतं. त्यामुळे कबीरला कोणत्याही परिस्थितीत अटक करून त्याला भारतात परत आणण्यासाठी राॅ एजंट सक्रीय होतात. कबीरला जेरबंद करण्याच्या मोठ्या कामगिरीसाठी मेजर विक्रमची (ज्यु. एनटीआर) नियुक्ती करण्यात येते. मग कथानकात अनपेक्षित वळणं येतात. कबीरचा उद्देश नेमका काय असतो? तो खरंच देशाविरुद्ध गद्दारी करतो का? मेजर विक्रम नक्की कोण असतो? अशा सर्व प्रश्नांची उत्तरं देऊन 'वॉर २' संपतो.
लेखन - दिग्दर्शन:
अयान मुखर्जीने या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. 'वॉर'च्या पहिल्या भागाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केलं होतं. सिद्धार्थने 'वॉर'च्या पहिल्या भागात तगडी ॲक्शन दाखवली होतीच, शिवाय उत्कृष्ट पटकथाही लिहिली होती. पण अयानने फक्त ॲक्शन दाखवण्यावर भर दिला आहे. कथेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलंय. मुळात आपल्याला नेमकं काय दाखवायचंय, याविषयीच दिग्दर्शक म्हणून अयान गोंधळला आहे.
त्यामुळे 'वॉर २' अतिशय विस्कळीत पद्धतीने समोर येतो. दिग्दर्शनातही VFX चा अतिवापर केल्याने ॲक्शन सीन्स अजिबात प्रभावी वाटत नाहीत. सगळे कलाकार सुपरहिरो असल्यासारखे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उड्या मारताना दिसतात. ट्रेनच्या छप्परावर सहज गाडी चालवतात. त्यामुळे डोक्याला हात मारण्याची वेळ येते.
अभिनय:
'वॉर २' सुरुवातीपासून शेवटपर्यंत केवळ एकाच गोष्टीमुळे सुसह्य होतो तो म्हणजे हृतिक रोशनमुळे. कबीरच्या भूमिकेत हृतिकने 'वॉर २' एकहाती स्वत:च्या खांद्यावर पेलला आहे. त्याची एनर्जी, त्याची स्टाईल, त्याचा डान्स केवळ अप्रतिम. हृतिकचा वावर 'वॉर २'चं कंटाळवाणं वातावरण काही क्षण सुखद करतो. हृतिक खऱ्या अर्थाने ॲक्शन स्टार का आहे, याची पुन्हा एकदा प्रचिती 'वॉर २' पाहून मिळते.
दुसरीकडे साऊथ सुपरस्टार ज्यु. एनटीआरने त्याची भूमिका ठीकठाक साकारलीय. ज्यु.एनटीआरच्या भूमिकेला लिखाणाची साथ न मिळाल्याने त्याची व्यक्तिरेखा ताकदीने समोर येत नाही. तरी हृतिकने एनटीआरला सांभाळून घेतलंय. कियारा अडवाणी, आशुतोष राणा यांनीही त्यांच्या वाट्याला जे प्रसंग आहेत ते उत्तम साकारले आहेत. विशेष भूमिकेत अनिल कपूरही लक्षात राहतात.
चांगली बाजू: हृतिक रोशनचा अभिनय, बॅकग्राऊंड म्युझिक, ज्यु. एनटीआर आणि हृतिकचे एकत्र सीन्स
वाईट बाजू: कथानक, VFX चा नकलीपणा, ॲक्शनचा भडीमार.
तर एकूणच तुम्ही हृतिकचे चाहते असाल तरच 'वॉर २' तुम्ही एकदा बघू शकता. अयान मुखर्जीने थोडं कथेवर काम केलं असतं तर, 'वॉर २' एक उत्कृष्ट रिव्हेंज ड्रामा घडला असता. असो! आणखी एक, सिनेमा संपल्यावर लगेच थिएटरबाहेर जाऊ नका, कारण YRF च्या स्पाय युनिव्हर्सच्या पुढील सिनेमाची झलक 'वॉर २'च्या शेवटी दिसते.