The Family Man 3 Review: 'श्रीकांत तिवारी'वरच 'टास्क फोर्स'ला संशय; या मिशनमध्ये 'द फॅमिली मॅन' पास की फेल? वाचा रिव्ह्यू

By देवेंद्र जाधव | Updated: November 21, 2025 13:27 IST2025-11-21T13:04:54+5:302025-11-21T13:27:45+5:30

The Family Man 3 Review : बहुचर्चित 'द फॅमिली मॅन ३' वेबसीरिज रिलीज झाली आहे. ही सीरिज पाहण्याआधी वाचा हा रिव्ह्यू

The Family Man 3 Review starring manoj bajpayee jaideep ahlawat nimrat kaur webseries | The Family Man 3 Review: 'श्रीकांत तिवारी'वरच 'टास्क फोर्स'ला संशय; या मिशनमध्ये 'द फॅमिली मॅन' पास की फेल? वाचा रिव्ह्यू

The Family Man 3 Review: 'श्रीकांत तिवारी'वरच 'टास्क फोर्स'ला संशय; या मिशनमध्ये 'द फॅमिली मॅन' पास की फेल? वाचा रिव्ह्यू

Release Date: November 21,2025Language: हिंदी
Cast: मनोज वाजपेयी, जयदीप अहलावत, निम्रत कौर, प्रियामणि, अश्लेशा ठाकूर, शरीब हाश्मी, गुल पनाग, वेदांत सिन्हा
Producer: राज निदीमोरू, कृष्णा डीकेDirector: राज आणि डीके
Duration: 7 EpisodesGenre:
लोकमत रेटिंग्स

The Family Man 3 Review : 'द फॅमिली मॅन' वेबसीरिजच्या दोन्ही सीझनला प्रेक्षकांची पसंती मिळाली. रहस्यमयी कथानक, कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय, अंगावर काटा आणणारे प्रसंग या जोरावर 'द फॅमिली मॅन'चे दोन्ही सीझन चांगलेच गाजले. आता तब्बल ४ वर्षांनी 'द फॅमिली मॅन'चा तीसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे सर्वांच्या या सीरिजबद्दल अपेक्षा उंचावल्या होत्या. प्रेक्षकांच्या याच अपेक्षा पूर्ण करण्यात 'द फॅमिली मॅन ३' सीरिज यशस्वी होते का? जाणून घ्या

कथानक

'द फॅमिली मॅन ३'मध्ये श्रीकांत आणि त्याची पत्नी सुचित्रा या दोघांमध्ये दुरावा निर्माण झालेला असतो. त्यांची दोन्ही मुलं आता मोठी झाली आहेत. धृती कॉलेजच्या चळवळीत सक्रीय दिसते तर अथर्व शाळेत शिकतोय. शारीरिक आणि मानसिक दुखापतीतून सावरत झोया पुन्हा एकदा टास्कमध्ये जॉईन होते.

अशातच भारताच्या पंतप्रधान मणिपूर, नागालँड या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील असतात. पंतप्रधानांच्या आदेशानुसार, श्रीकांत तिवारी आणि त्याचे बॉस कुलकर्णी हे दोघे नागालँडला जातात. त्या भागातील संघटनांशी चर्चा करुन शांतता करार करण्याचा त्यांचा उद्देश असतो. नागालँडला गेल्यावर श्रीकांत आणि कुलकर्णी यांच्यावर स्थानिक ड्रग डीलर रुक्मा जीवघेणा हल्ला करतो.

परंतु या हल्ल्यामागचा सूत्रधार दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः श्रीकांत तिवारी आहे, असा टास्कमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना संशय येतो. त्यामुळे श्रीकांतला अटक करण्यासाठी वॉरंट निघतं. हे समजताच श्रीकांत कुटुंबासोबत मुंबईतून पळ काढतो. पुढे काय होतं? श्रीकांत त्याच्यावरचा डाग कसा पुसतो? रुक्मा नक्की कोण असतो? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला 'द फॅमिली मॅन ३' बघून मिळतील.



लेखन- दिग्दर्शन

'द फॅमिली मॅन ३'चं कथानक यावेळी काहीसं गुंतागुंतीचं आहे. आधीच्या दोन सीझनमध्ये प्रत्येक भागात जो एक वेगवानपणा होता, त्याचा या सीझनमध्ये अभाव जाणवतो. पहिला भाग वगळता उर्वरीत सर्व भागात प्रत्येकजण एकमेकांचा पाठलाग करताना दिसतो. कोणी एका देशातून दुसऱ्या देशात लपतो. त्यामुळे विशेष असं काही घडत नाही. म्हणूनच कथानकाची पकड सुटते. श्रीकांत तिवारीची मुख्य व्यक्तिरेखाही यावेळी काहीशी गोंधळलेली वाटते.

श्रीकांतसमोर खलनायक म्हणून समोर उभा राहिलेला रुक्मा तितका प्रभाव पाडत नाही. श्रीकांत आणि रुक्मा हे शेवटच्या काही मिनिटांसाठी एकमेकांसमोर येतात. परंतु त्यांच्यातला तणाव हवा तसा रंगत नाही. सीरिजमधली एक चांगली बाजू म्हणजे श्रीकांत आणि जेके जेव्हा सीनमध्ये एकत्र असतात तेव्हा मजा येते. याशिवाय श्रीकांतचे मुलांसोबतचे प्रसंगही हसू आणतात. परंतु आधीच्या दोन सीझनप्रमाणे अंगावर काटा आणणारी दृश्य, धक्कादायक प्रसंग, उत्कृष्ट अॅक्शन सीन्स यांची मात्र कमतरता जाणवते. यावेळी दिग्दर्शनातही राज आणि डीके यांनी इतकी कमाल केलेली दिसत नाही. 



अभिनय:

'द फॅमिली मॅन ३'मध्ये सर्वच कलाकारांनी आपल्या वाट्याला आलेल्या भूमिका चांगल्या साकारल्या आहेत. मनोज वाजपेयींनी पुन्हा एकदा श्रीकांत तिवारीच्या भूमिकेत छाप पाडलीये. कुटुंबासाठी हळवा आणि देशासाठी स्वतःचे प्राण पणाला लावणाऱ्या श्रीकांतची आर्तता मनोज यांनी उत्कृष्ट दाखवली आहे.

दुसरीकडे खलनायक म्हणून रुक्माच्या भूमिकेत जयदीप अहलावतने सहज अभिनयाचं दर्शन घडवलंय. परंतु लिखाणाची इतकी साथ न मिळाल्याने जयदीप अहलावतच्या अभिनयात मर्यादा आलेल्या दिसतात. शरीब हाश्मीने जेकेची भूमिका त्याच्या कॉमिक टायमिंगमुळे अफलातून रंगवली आहे. इतर भूमिकांमध्ये प्रियामणि, अश्लेशा ठाकूर, श्रेया धन्वंतरी यांनीही चांगलं काम केलंय. याशिवाय या सीरिजमध्ये एका खास अभिनेत्याची सरप्राईज एन्ट्री प्रेक्षकांना सुखद धक्का देणारी ठरेल. 

सकारात्मक बाजू: कलाकारांचा अभिनय, विनोदी प्रसंग
नकारात्मक बाजू: संथ कथानक, मुख्य कलाकारांकडे दुर्लक्ष, क्लायमॅक्स

थोडक्यात काय तर, आधीच्या दोन सीझनपेक्षा 'द फॅमिली मॅन'चा तीसरा सीझन हा प्रेक्षकांची निराशा करणारा आहे. 'द फॅमिली मॅन ३'ची भरकटलेली कथा शेवटपर्यंत रुळावर येत नाही. याशिवाय हा सीझनही अर्धवट संपवल्याने 'द फॅमिली मॅन ४' येणार हे निश्चित झालंय. परंतु मनोज वाजपेयी, जयदीप अहलावत, शरीब हाश्मी, निम्रत कौर अशी तगडी स्टारकास्ट असूनही 'द फॅमिली मॅन ३' अपेक्षांची पूर्तता करत नाही, हेच कटू सत्य आहे.

Web Title: The Family Man 3 Review starring manoj bajpayee jaideep ahlawat nimrat kaur webseries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.