Taath Kanaa Review: डॉ प्रेमानंद रामाणींची संघर्षगाथा, उमेश कामतने 'ताठ कणा'चं आव्हान यशस्वीपणे पेललं का? वाचा रिव्ह्यू
By ऋचा वझे | Updated: November 28, 2025 10:02 IST2025-11-28T10:02:04+5:302025-11-28T10:02:44+5:30
उमेश कामतचा बहुचर्चित 'ताठ कणा' सिनेमा पाहण्याचा विचार करताय? जाणून घ्या कसा आहे सिनेमा

Taath Kanaa Review: डॉ प्रेमानंद रामाणींची संघर्षगाथा, उमेश कामतने 'ताठ कणा'चं आव्हान यशस्वीपणे पेललं का? वाचा रिव्ह्यू
मोडून पडले सारे, तरी मोडला नाही कणा, पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा! कुसुमाग्रजांच्या याच ओळींवरुन प्रेरणा घेत पाठीच्या कण्यावरील 'प्लीफ सर्जरी'चा शोध लावणारे प्रसिद्ध न्यूरो सर्जन डॉ. प्रेमानंद रामाणी यांच्या आयुष्यावर आधारित 'ताठ कणा' सिनेमा रिलीज झाला आहे. डॉ. रामाणींचा प्रेरणादायी प्रवास यातून उगलडला आहे
कथानक - डॉ. प्रेमानंद रामाणींचा जन्म गोव्यातील छोट्याशा गावात झाला. वडिलांची फिरतीची नोकरी आणि आई गृहिणी. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असणाऱ्या प्रेमानंद यांना कायमच पाठीच्या कण्याचं अप्रुप होतं. डॉक्टर बनण्याचं त्यांचं स्वप्न होतं. पण घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने ते मुंबईत आपल्या मामाकडे येतात. तिथे १० वर्ष राहून प्रेमानंद खूप अभ्यास करतात आणि एमबीबीएस होतात. पुढे इंग्लंडलाही जातात.
वैद्यकीय क्षेत्रात नाव कमावतात. या सगळ्या काळात पाठीच्या कण्यावर सर्जरीचं त्यांचं संधोधन सुरुच असतं. मात्र त्यांना लवकर यश मिळत नाही. या प्रवासात त्यांची पत्नी सतत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. त्यांच्या आयुष्यातील दोन महत्वाच्या केसेस आणि पाठीच्या कण्यावरील 'प्लीफ सर्जरी' यशस्वी करण्याचं ध्येय यावर संपूर्ण सिनेमा आधारित आहे. प्लीफ सर्जरीचं समीकरण ते कसं सोडवतात आणि रुग्णांना पाठीच्या कणाच्या वेदनेतून कसे बाहेर काढतात हे सिनेमा पाहून कळेल.
लेखन-दिग्दर्शन - गिरीश मोहिते यांनी सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. डॉ रामाणींचा संपूर्ण कार्यकाळ दाखवताना सिनेमा काहीसा तुकड्या तुकड्यात झाल्याचा भास होतो. पहिला भाग मध्येच काहीसा रटाळ होतो आणि संथ गतीने पुढे सरकतो. काही विनोदी संवाद प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू नक्की आणतात. मात्र सिनेमाच्या सुरुवातीलाच समुद्राच्या पोटातील जैव विविधतेचे सीन्स कॉपी केल्यासारखे वाटतात. एकंदर लेखन आणि दिग्दर्शनात अनेक ठिकाणी सिनेमा काहीसा कमी पडतानाही दिसतो.
अभिनय -उमेश कामतने डॉ. रामाणींच्या भूमिकेला न्याय दिला आहे. त्यांची चालण्याची तऱ्हा, वाढलेलं वजन, चेहऱ्यावरील हावभाव त्याने उत्तम निभावलं आहे. आपल्या विनोदाच्या टायमिंमधून त्याने तो रंगभूमीवरील कलाकार आहे हे पुन्हा सिद्ध केलं आहे. दीप्ती देवीने पत्नीच्या भूमिकेत त्याला चांगली साथ दिली आहे. सायली संजीवनेही छोट्याशा भूमिकेतून लक्ष वेधलं आहे.
सकारात्मक बाजू - अभिनय, प्रेरणादायी कथा
नकारात्मक बाजू - दिग्दर्शनातील त्रुटी, मध्येच कंटाळवाणा अनुभव
थोडक्यात वैद्यकीय क्षेत्राशी निगडित लोकांना सिनेमा नक्कीच प्रेरणा देईल. तसंच इतरांनाही एका प्रसिद्ध न्यूरो सर्जनची सिनेमाच्या माध्यमातून ओळख होण्यासाठी मदत मिळेल.