Son Of Sardar 2 Movie Review: 'सरदारी' विनोदाला कन्फ्युजनचा तडका

By संजय घावरे | Updated: August 2, 2025 16:09 IST2025-08-02T16:07:44+5:302025-08-02T16:09:48+5:30

Son Of Sardar 2 Movie Review: 'सन ऑफ सरदार २' या चित्रपटात 'सरदारी' विनोदाला कन्फ्युजनचा तडका देत गडबड, गोंधळ निर्माण करणारे कथानक सादर केले आहे.

Son Of Sardar 2 Movie Review: Confusion hits the comedy of 'Sardari' | Son Of Sardar 2 Movie Review: 'सरदारी' विनोदाला कन्फ्युजनचा तडका

Son Of Sardar 2 Movie Review: 'सरदारी' विनोदाला कन्फ्युजनचा तडका

Release Date: August 01,2025Language: हिंदी
Cast: अजय देवगण, मृणाल ठाकूर, रवी किशन, दीपक डोबरीयाल, नीरू बाजवा, कुब्रा सैत, विंदू दारा सिंह, मुकुल देव, संजय मिश्रा
Producer: अजय देवगण, ज्योती देशपांडे, प्रवीण तलरेजा, एन. आर. पचीसियाDirector: विजय कुमार अरोरा
Duration: दोन तास २५ मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

>> संजय घावरे

राष्ट्रीय पारितोषिक विजेते पंजाबी दिग्दर्शक विजय कुमार अरोरा यांनी या चित्रपटात मॅड कॅामेडीचा आधार घेतला आहे. असे सिनेमे डोकं बाजूला ठेवून बघावे लागतात. फार चिकित्सा करायला गेल्यास निराशा होते. या चित्रपटात 'सरदारी' विनोदाला कन्फ्युजनचा तडका देत गडबड, गोंधळ निर्माण करणारे कथानक सादर केले आहे. 

कथानक : पत्नी डिंपल लंडनमध्ये आणि स्वत: भारतात असलेल्या जस्सीची ही गोष्ट आहे. पत्नीला भेटण्यासाठी जस्सी लंडनला जातो, पण तिला घटस्फोट हवा असतो. त्यामुळे भेदरलेल्या जस्सीची भेट लग्नांमध्ये नाच-गाणे करणारी मूळची पाकिस्तानी असलेल्या राबियाशी होते. तिची एक वेगळीच कथा आहे. पतीने सोडलेल्या राबियाला सबा नावाची सावत्र मुलगी आहे. तिचे गोगी नावाच्या मुलावर प्रेम आहे, पण त्याचे वडील राजा संधू कमालीचे देशभक्त आहेत. अशा परिस्थितीत दोघांचे लग्न लावून देण्यासाठी जस्सीने केलेले नाटक चित्रपटात आहे.

लेखन-दिग्दर्शन : कथा-पटकथा म्हणावे असे या चित्रपटात काही नाही. भारत-पाकिस्तानमधील वैरभाव, नात्यांमधील दुरावा, समज-गैरसमज आणि विनोदी प्रसंगांच्या आधारे केवळ हसवण्याचा प्रयत्न केला आहे. काही विनोदी प्रसंग आणि संवाद पोट धरून हसवतात. काही ठिकाणी मात्र हसावे की रडावे हे समजत नाही. या चित्रपटात इतक्या व्यक्तिरेखा आहेत की त्यांची नावे लक्षात राहणेही मुश्किल होते. गीत-संगीत चांगले आहे. चित्रपट चकचकीत आहे, पण पंजाबी बोलीभाषा आणि वेशभूषेकडे आणखी लक्ष देण्याची गरज होती. लोकेशन्स आणि सिनेमॅटोग्राफीही चांगली आहे. सुरुवातीला गती संथ वाटते.

अभिनय : अजय देवगणने आपल्या नेहमीच्याच शैलीत मागच्या पानावरून पुढे सुरू याप्रकारे अभिनय केला आहे. जस्सीच्या व्यक्तिरेखेतील कन्फ्युज भाव त्याने यशस्वीपणे सादर केले आहेत. मृणाल ठाकूरने आपल्या व्यक्तिरेखेला न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला असला तरी पंजाबी लहेजासाठी आणखी मेहनत घेण्याची गरज होती. रवी किशनने रंगवलेला सरदार असरदार वाटतो. संजय मिश्रांनी पुन्हा एकदा अफलातून फटकेबाजी केली आहे. दीपक डोब्रियालने तृतीय पंथीयाच्या भूमिकेत चांगला प्रयत्न केला आहे. इतर सर्वच कलाकारांनी चांगली साथ दिली आहे.

सकारात्मक बाजू : अभिनय, दिग्दर्शन, गीत-संगीत, लोकेशन, वातावरण निर्मिती, सिनेमॅटोग्राफी
नकारात्मक बाजू : पटकथा, सुरुवातीची गती, काही टुकार प्रसंग
थोडक्यात काय तर 'आमचा हसवण्याचा धंदा' असे म्हणत बनवलेल्या या चित्रपटातील प्रत्येक प्रसंगात लाॅजिक शोधायला गेल्यास फसगत होईल.

 

Web Title: Son Of Sardar 2 Movie Review: Confusion hits the comedy of 'Sardari'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.