Qarib Qarib Singlle Movie Review : ‘ नात्यांना वेगळया चौकटीतून अनुभवण्याचा प्रवास ’
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 19:16 IST2017-11-10T06:12:04+5:302023-08-08T19:16:16+5:30
अभिनेता इरफान खान एखाद्या रोमँटिक सिनेमात काम करू शकतो, अशी कल्पना खरंतर आपण कधीही केली नसेल. मात्र, तो जेव्हा एखादी भूमिका साकारतो तेव्हा त्या भूमिकेला पूर्णपणे न्याय देतो.

Qarib Qarib Singlle Movie Review : ‘ नात्यांना वेगळया चौकटीतून अनुभवण्याचा प्रवास ’
‘पिकू’,‘पान सिंग तोमर’,‘ जज्बा’,‘ द लंचबॉक्स’ अशा चित्रपटांत काम करणारा अभिनेता इरफान खान एखाद्या रोमँटिक सिनेमात काम करू शकतो, अशी कल्पना खरंतर आपण कधीही केली नसेल. मात्र, तो जेव्हा एखादी भूमिका साकारतो तेव्हा त्या भूमिकेला पूर्णपणे न्याय देतो. एखाद्या साध्या लव्हस्टोरीलाही तो एकदम हिट करून टाकतो. मग अशावेळी फक्त इरफान खानला पडद्यावर अनुभवण्यासाठी पाऊले चित्रपटगृहाकडे वळतात हे नक्की.
‘करिब करिब सिंगल’ हा सिनेमा एक कवी वियोगी ( इरफान खान) आणि फॅशन तसेच सोशल मीडियावर प्रेम असणाऱ्या जया ससिधरन (पार्वती) या सिंगल असणाऱ्या दोघांची संदिग्ध लव्हस्टोरी आहे. हे दोघे वेबसाईटवर डेटिंग करताना एकमेकांना भेटतात. जया आणि योगी हे एकमेकांना योग्य साथीदार आहेत की नाही या निर्णयावर येऊन थांबतात. मग, ते त्यांच्या अगोदरच्या प्रेमींना भेटण्याचा प्रवास सुरू करतात. यादरम्यान ते देहरादून, अल्वार, जयपूर आणि गंगटोक या ठिकाणांहून त्यांना वेगवेगळे अनुभव येत राहतात.
जुन्या प्रेमवीरांना भेटण्याच्या या त्यांच्या प्रवासातून त्यांना एक वेगळा योगी आणि वेगळया जयाची भेट होते. एक अतिमहत्त्वाकांक्षी आणि स्वत:चं म्हणणं अधिक तीव्रतेने पटवून देणारा योगी आणि स्वत:मध्ये अधिक गुरफटलेल्या जयाची त्यांना ओळख होते. असं असताना त्यांचं एकमेकांशी पटेल का? यावर आधारित ‘करिब करिब सिंगल’ चित्रपटाची कथा सामावलेली आहे. दिग्दर्शक तनुजा चंद्रा यांनी प्रेम, प्रवास आणि अपेक्षा यांच्या भोवती फिरणारी कथा पडद्यावर साकारली आहे. खरं सांगायचं तर, इरफानचा पडद्यावर सहज वावर आणि भोवती घडणाºया घटनांचं टेन्शन न घेणारा त्याचा स्वभाव त्याला एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून सिद्ध करतो. त्याचबरोबर एक फ्रेश आणि फनी हिरोईनही जोडीला असल्यावर त्यांची ही लव्हस्टोरी पडद्यावर अनुभवायला काहीच हरकत नाही, असं वाटतं.