Lipstick Under My Burkha Review : ‘बोल्ड अॅण्ड ब्यूटिफूल’!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 19:28 IST2017-07-21T10:49:49+5:302023-08-08T19:28:38+5:30
चित्रपटाची कथा भोपाळमध्ये राहणा-या एका छोट्याशा मोहल्ल्यातील चार महिलांवर आधारित आहे.
.jpg)
Lipstick Under My Burkha Review : ‘बोल्ड अॅण्ड ब्यूटिफूल’!!
चित्रपटाची कथा भोपाळमध्ये राहणाºया एका छोट्याशा मोहल्ल्यातील चार महिलांवर आधारित आहे. या चारही महिला स्वातंत्र्याच्या शोधात असतात. समाजाच्या बंधनातून मुक्त होऊन त्यांना मोकळ्या हवेत श्वास घ्यायचा असतो. रेहाना (पल्बिता बोरठाकूर) एक अल्पवयीन मुलगी असते, मात्र तिला याच कारणामुळे घरातदेखील बुरखा घालून वावरावे लागते. वास्तविक रेहानाला मायली सायरस व्हायचे असते. मात्र जीन्स घालण्याला विरोध असताना, मायली सायरस होण्याचे स्वप्न बाळगणे म्हणजे आगीत उडी घेण्यासमान असते. परंतु अशातही ती कॉलेजमध्ये जीन्सवरील बंदीविरोधात आवाज उठविते. चित्रपटातील दुसरे पात्र शिरीन (कोंकणा सेन शर्मा) एक नियमित बुरखा घालणारी गृहिणी असते. तिचा पती (सुशांत सिंग) खूपच पारंपरिक विचाराचा असतो. तो तिला सेक्स आॅब्जेक्टपेक्षा अधिक काहीही सांगू शकत नाही. मात्र अशातही संसारात रमण्याचा ती प्रयत्न करते. सेल्स जॉब करताना त्यात ती तिचा आनंद शोधत असते.
लीला (आहना कुमारा) एक पार्लर चालवित असते. तिला मधुचंद्राच्या रात्रीचे सतत स्वप्न पडत असतात. मात्र ती या रात्रीची प्रतीक्षा करू शकत नाही. त्यामुळे ही इच्छा पूर्ण करण्यासाठी तिची धडपड असते. तिचे फोटोग्राफर अरशद (विक्रांत मास्सी) याच्यावर प्रेम असते. परंतु तो तिला फारसा भाव देत नाही. पुढे लीलाचे लग्न ठरते. बुआजी ऊर्फ उषा परमार (रत्ना पाठक-शाह) या ५५ वर्षीय महिलेचे लैंगिक अस्तित्त्व समाजाला अजिबातच स्वीकार्ह नसते. जेव्हा ती स्विमिंगसाठी जात असते, तेव्हा ती तेथील फोनवरून तरुणांशी सेक्सविषयी गप्पा मारते. यावेळी ती तरुणांशी नाव बदलून बोलत असते. वास्तविक या चारही महिला मातीच्या घरात राहतात. हे घर बुआजीच्या मालकीचे असते, तर इतर तिघी या घरात भाडेकरू असतात.
चार महिलांचे स्वप्न समान असते. चौघीही स्वप्नातच लैंगिक स्वातंत्र्याचा उपभोग घेत असतात. मात्र त्यांना हा आनंद स्वप्नात नव्हे तर प्रत्यक्षात घ्यायचा असतो. यासाठी त्या विद्रोह करतात. हाच त्यांचा विद्रोह विचार करण्यास भाग पाडणारा आहे. चित्रपटाची कथा खूपच साधी आणि सरळ आहे. ‘लिपस्टिक’ नावाच्या स्वप्नवत कादंबरीभोवती फिरणारा हा चित्रपट सेक्सवर आधारित कथा सांगितल्यासारखा वाटतो. याशिवाय आजही महिलांप्रती समाजाचा दृष्टिकोन कसा आहे? याबाबतचे जळजळीत सत्य समोर येते. चित्रपटाच्या कथेचे लेखन खूपच प्रभावीपणे केले आहे. सोपे आणि प्रभावी संवाद कथेला एका उंचीवर घेऊन जातात. त्यातच दिग्दर्शक अलंकृता श्रीवास्तव यांनी प्रत्येक पात्र पडद्यावर उत्तमरीत्या साकारल्याने, चित्रपट बघणारा प्रेक्षक अखेरपर्यंत खिळून राहतो.
दिग्दर्शन, लोकेशन्स, सिनेमेटोग्राफी आणि एडिटिंग खूपच प्रभावी आहे. शिवाय गावातील लाइफस्टाइल खूपच हटके अंदाजात मांडली आहे. चित्रपटातील प्रत्येक पात्र कथेला एका उंचीवर घेऊन जाते. रत्ना पाठक-शाह आणि कोंकणा सेन शर्मा यांचा अभिनय खूपच दमदार आहे. अहाना कुमरा हिचा बोल्ड अंदाज आणि पल्बिताचा प्रभावी अभिनय प्रेक्षकांना निराश करीत नाही, तर त्यांच्या अपोझिट असलेल्या सुशांत सिंग, विक्रांत मास्सी, शशांक अरोडा यांनीही त्यांच्या वाट्याला आलेले काम प्रभावीपणे केले आहे. वास्तविक हा चित्रपट मसालापट नसल्याने यामध्ये कॉमेडी, आयटम साँग किंवा लव्हस्टोरी बघावयास मिळणार नाही. त्यामुळे मसालापटाचे शौकिन असलेल्या प्रेक्षकांचा हा चित्रपट बघताना हिरमोड होऊ शकतो. त्यातच चित्रपटाला अॅडल्ट सर्टिफिकेट मिळाल्याने, काही प्रेक्षक याकडे पाठ फिरवू शकतात.