Kairi Movie Review: गोड की आंबट? कसा आहे सायली संजीवचा 'कैरी' सिनेमा, वाचा रिव्ह्यू
By देवेंद्र जाधव | Updated: December 13, 2025 17:26 IST2025-12-13T17:22:15+5:302025-12-13T17:26:30+5:30
सायली संजीवची प्रमुख भूमिका असलेला 'कैरी' सिनेमा रिलीज झालाय. थिएटरमध्ये पाहायला जाण्याच्या आधी जाणून घ्या कसा आहे सिनेमा

Kairi Movie Review: गोड की आंबट? कसा आहे सायली संजीवचा 'कैरी' सिनेमा, वाचा रिव्ह्यू
देवेंद्र जाधव>>>
सायली संजीवची प्रमुख भूमिका असलेला 'कैरी' सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. कोकणातील निसर्गरम्य वातावरणात गुंफलेलं कथानक याशिवाय लंडनमध्ये झालेलं शूटिंग अशा अनेक गोष्टींमुळे 'कैरी' सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. 'कैरी' सिनेमाचा आस्वाद घेऊन तुमचंही मन सुखावून जाईल का? वाचा रिव्ह्यू
कथानक:
कोकणातील वातावरणात लहानाची मोठी झालेली कावेरी सर्वांची लाडकी मुलगी. कावेरीला सर्व लाडाने कैरी म्हणतात. कावेरी आणि आकाश लहानपणापासूनचे मित्र. लंडनमध्ये नोकरी करणारा आकाश एक दिवस कोकणातील त्याच्या घरी येते. आकाश कैरीला लग्नाची मागणी घालतो. दोघेही लहानपणापासून एकमेकांचे मित्र असल्याने दोघांच्याही घरचे लग्नाला आनंदाने तयार होतात. लग्न झाल्यावर आकाश कैरीला घेऊन लंडनमध्ये येतो.
साधीभोळी कैरी लंडनमध्ये आल्यावर काहीशी गोंधळून जाते. एक दिवस सकाळी उठल्यावर तिला आकाश घरात कुठेच दिसत नाही. आकाश कैरीला सोडून गायब झालेला असतो. लंडनसारख्या अनोळखी देशात हरवलेल्या आकाशचा शोध घेण्यात कैरी यशस्वी होईल का? आकाश नक्की कुठे गेलेला असतो? तो सापडतो का? अशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला 'कैरी' सिनेमा पाहून मिळतील.
लेखन- दिग्दर्शन:
स्वरा मोकाशीने 'कैरी' हा सिनेमा लिहिला आहे तर शंतनू रोडे यांनी सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. सुरुवातीला सिनेमात दिसणारं कोकणाचं निसर्गरम्य दर्शन पाहून डोळ्यांचं पारण फिटतं. 'कैरी'ची सुरुवात वेगवान आहे.
पहिल्या दहा मिनिटातच सिनेमा मूळ विषयाकडे येतो. परंतु कैरी-आकाश लंडनमध्ये गेल्यावर कथानकाचा वेग मंदावतो. तरीही सिनेमाचा मध्यंतर उत्कंठावर्धक असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचते. पुढे काय होणार, हे जाणून घेण्याचं कुतुहल असतं. हरवलेल्या आकाशचं नक्की काय होतं? याचा शोध घेताना आपणही कैरीप्रमाणे अस्वस्थ होतो. कोकणाच्या मातीत घडलेलं संगीत आणि गाणी ऐकायला छान वाटतात.
अभिनय:
सायली संजीवने कैरीची भूमिका समरसून साकारली आहे. कैरीच्या मनातील तगमग, लंडनमध्ये आल्यावर उडालेला गोंधळ, स्वभावातील निरागसपणा सायलीने उत्कृष्ट दाखवला आहे. पण काही ठिकाणी सायलीची संवादफेक एकसुरी वाटते. टीव्ही इंडस्ट्रीतील रोमँटिक अभिनेता शशांक केतकरला अशा वेगळ्या भूमिकेत पाहणं एक सुखद धक्का आहे. आकाशचा रहस्यमयी स्वभाव शशांकने उत्कृष्टपणे दाखवला आहे. लंडनमधील मराठी पोलीस म्हणून सुबोध भावे शोभून दिसतो. सिद्धार्थ जाधवनेही छोटीशी भूमिका कमाल साकारली आहे.
सकारात्मक बाजू: कोकणातील निसर्गरम्य दृश्य, रहस्यमयी कथानक
नकारात्मक बाजू: ताणलेले प्रसंग, संथ गती
थोडक्यात सांगायचं तर, ज्या प्रेक्षकांना रहस्यमयी कथा आणि शेवटपर्यंत उत्सुकता ताणून धरणारे सिनेमे बघण्याची आवड असेल त्यांना 'कैरी' हा सिनेमा नक्कीच आवडेल. त्यामुळे सायली संजीवचा 'कैरी' हा सिनेमा चित्रपटगृहामध्ये एकदा नक्कीच बघू शकता.