Jaat Review : ॲक्शन, इमोशन अन् ड्रामा, सनी देओलचा 'जाट' म्हणजे फुल टू गदर! वाचा रिव्ह्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 13:02 IST2025-04-11T13:01:51+5:302025-04-11T13:02:54+5:30
‘जाट’ हा दाक्षिणात्य चित्रपट असून यात सनीसोबत रणदीप हुडा आणि विनीत कुमार यांच्यासारख्या प्रतिभावान कलाकारांची कास्टिंग करण्यात आली आहे. चला तर मग बघूयात, कसा आहे हा चित्रपट नेमका...

Jaat Review : ॲक्शन, इमोशन अन् ड्रामा, सनी देओलचा 'जाट' म्हणजे फुल टू गदर! वाचा रिव्ह्यू
>>रंजू मिश्रा
सनी देओलच्या चित्रपटात ॲक्शन, इमोशन, ड्रामा यांच्यासोबतच संवाद देखील खूप दमदार असतात. त्याचा ‘ढाई किलो का हाथ’ हा संवाद प्रचंड प्रसिद्ध आहे. हा संवाद ‘जाट’च्या ट्रेलरमध्ये ऐकून चित्रपटाबाबतची उत्सुकता निर्माण होते. ‘जाट’ हा दाक्षिणात्य चित्रपट असून यात सनीसोबत रणदीप हुडा आणि विनीत कुमार यांच्यासारख्या प्रतिभावान कलाकारांची कास्टिंग करण्यात आली आहे. चला तर मग बघूयात, कसा आहे हा चित्रपट नेमका...
कथानक : चित्रपटाची सुरुवात २००९ मध्ये श्रीलंकेतून होते. जमिनीच्या खोदकामात दोन भाऊ राणातुंगा (रणदीप हुडा) आणि सोमलू (विनीत कुमार सिंग) यांना सोन्याच्या विटांनी भरलेला बॉक्स मिळतो. त्या बॉक्सला घेऊन ते आंध्रप्रदेशात येतात. बघता बघता ते ४० गावांत आपला दबदबा निर्माण करतात. त्यांच्या भागात त्यांची आणि त्यांच्या गुंडाचीच चलती असते. नेता, पोलिस, प्रशासन आदी सगळेच त्यांच्या हातात असतात. एके दिवशी त्यांच्या भागात एक जाट (सनी देओल) येतो. त्याच्यासोबत असे काही होते की ‘सॉरी’ म्हणवून घेण्याच्या नादात तो राणातुंगापर्यंत पोहोचतो. त्याच्या भागात असा काही गदर तो करतो की, त्याला मोठ्या पडद्यावरच पाहण्यात मजा आहे.
लेखन व दिग्दर्शन : साऊथचे चित्रपट प्रेक्षकांना का आवडतात याचे उत्तर तुम्ही ‘जाट’ चित्रपट पाहिल्यास मिळतात. त्यात काय नाही? भारी ॲक्शन सीन, इमोशन, मारधाड, ड्रामा, सुंदर कहाणी, कॉमेडी, संवाद तसेच उर्वशी रौतेलाचे आयटम साँगही आहे. लेखन व दिग्दर्शन उत्कृष्ट आहे. समुद्रकिनाऱ्यावरील सीन, अंधारात युद्ध हे सर्वच सुंदररित्या चित्रीत केले आहे.
अभिनय : सनी देओल पुन्हा एकदा ‘अँग्री मॅन’चा रूबाब दाखवत मन जिंकतो. त्याचे संवाद, देहबोली हे सर्वच खूप खास आहेत. रणदीप हुडा आणि विनीत कुमार यांचा अभिनय उत्तम आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या रूपात सैयामी खेर, राणातुंगाच्या पत्नीच्या भूमिकेत रेजिना, आईच्या रूपात स्वरूपा घोष यांनी उत्कृष्ट काम केले आहे तसेच राम्या कृष्णन, जगपती बाबू, उपेंद्र लिमये, मुरली शर्मा, मकरंद देशपांडे यांनी देखील आपली छाप सोडली आहे.
सकारात्मक बाजू - कथानक, अभिनय, लेखन-दिग्दर्शन, बॅकग्राऊंड स्कोर, सिनेमॅटोग्राफी, संपादन आदि.
नकारात्मक बाजू- क्रूरता असलेले दृश्य व कलाकार दोन ते तीन कपड्यांतही दिसतात.
सारांश- मसाला एंटरटेनर चित्रपट आहे, जरूर बघा.