दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 17:49 IST2025-11-22T17:48:26+5:302025-11-22T17:49:04+5:30
काजोलनेही मला 'त्रिभंगा'च्या वेळी आठच तास दिले होते...रेणुका शहाणेचा खुलासा

दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
गेल्या अनेक महिन्यांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीत एक वाद सुरु आहे. दीपिका पादुकोण या आघाडीच्या अभिनेत्रीने ८ तासांच्या शिफ्टची अट ठेवली. आई झाल्यानंतर तिने आता आपण ८ च तास काम करणार अशी मागणी केली. यानंतर तिला काही बिग बजेट सिनेमांमधून बाहेर काढलं गेलं. या मुद्द्यावर संमिश्र प्रतिक्रिया आल्या. आता यावर मराठी अभिनेत्री रेणुका शहाणेने प्रतिक्रिया दिली आहे.
रेणुका शहाणेने अभिनेत्रींच्या शिफ्टच्या मागणीवर बोलताना काजोलचं उदाहरण दिलं. 'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत रेणुका शहाणे म्हणाली, "मला वाटतं दीपिकाचा निर्णय योग्य आहे. मला आठवतंय 'त्रिभंगा'च्या वेळी काजोलने मला ८ च तास दिले होते. तिचा तो नियमच आहे. ती जास्त काम करत नाही. आधीपासूनच तिचं असं आहे आणि तिला जर सिनेमात घ्यायचं असेल तर तिची ही अट असते. तिची मुलं आता मोठी आहेत तरीही तिने ते कायम ठेवलं आहे. कारण तिला कुटुंब आणि काम दोन्हीमध्ये समतोल साधायचा आहे. तो तिचा प्रश्न आहे. जे लोक मान्य करत नाही त्यांच्याबरोबर ती काम करत नाही."
ती पुढे म्हणाली, "आजकाल टीव्हीवर डेली सोप्स करताना कित्येक कलाकार हे म्हणतायेत की आपल्याला वेळच मिळत नाही. जगणं विचित्र झालं आहे. त्यात समतोल असलाच पाहिजे. आरोग्यही बिघडतंय. खरंतर सिंटाने इंडस्ट्रीसाठी नियम दिलेले आहेत. पण दुर्दैवाने कोणीच ते पाळत नाही. आपण नाही म्हटलं तर आपल्याला सहज रिप्लेस करतात. आपली आतापर्यंतची मेहनच बघत नाहीत. मूल झाल्यावर तर मी नक्कीच समजू शकते की दीपिका नक्की कोणत्या स्पेसमध्ये आहे. काम करायची इच्छा असतेच पण दीपिका जी इतकी आघाडीची हिरोईन आहे तिला आता असं काम करायचं आहे तर तिने ते ठरवावं. तुम्हाला अमान्य असेल तर तिच्याबरोबर काम करु नका. पण त्यावरुन इतकी चर्चा करायचं काहीच कारण नाही."