७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 18:04 IST2025-12-19T18:03:46+5:302025-12-19T18:04:37+5:30
Rekha : रेखा यांनी नुकतीच महिमा चौधरी स्टारर 'दुर्लभ प्रसाद की दुसरी शादी' या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी आपल्या लग्नाबाबत खुलासा केला.

७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
'परदेस' फेम महिमा चौधरी आणि संजय मिश्रा यांची मुख्य भूमिका असलेला 'दुर्लभ प्रसाद की दूसरी शादी' हा चित्रपट आज सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. नुकतेच या चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते, जिथे बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांनी हजेरी लावली होती. यावेळी महिमा चौधरीसोबत पोझ देताना रेखा यांनी प्रसारमाध्यमांसमोर असे काही विधान केले की सर्वजण थक्क झाले.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये रेखा आणि महिमा चौधरी गप्पा मारताना दिसत आहेत. यावेळी रेखा पांढऱ्या रंगाच्या सूटवर प्रिंटेड दुपट्टा घेऊन अतिशय सुंदर दिसत होत्या. ७१ वर्षीय रेखा यांनी काळा चष्मा, लाल लिपस्टिक आणि भांगेत सिंदूर लावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. गप्पांच्या ओघात महिमा चौधरी गमतीने म्हणाली की, "मी दुसरे लग्न केले आहे", त्यावर रेखा यांनी लगेच उत्तर दिले, "लग्न पहिले असो वा दुसरे, मी तर आयुष्याशी लग्न केले आहे." रेखा यांचे हे उत्तर ऐकून महिमा भारावून गेली. त्यानंतर रेखा पुढे म्हणाल्या, "लग्न म्हणजे प्रेमाचे दुसरे नाव आहे. प्रेम आहे तर लग्न आहे आणि लग्न आहे तर प्रेम आहे."
रेखा यांची लव्ह लाईफ आणि सिंदूरचे गुपित
रेखा यांचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चढ-उतारांनी भरलेले राहिले आहे. त्यांचे नाव अनेक दिग्गज कलाकारांशी जोडले गेले, विशेषतः अमिताभ बच्चन आणि रेखा यांची प्रेमकहाणी आजही चर्चेत असते. रेखा यांनी दिल्लीतील व्यावसायिक मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केले होते, परंतु लग्नानंतर वर्षभराच्या आतच मुकेश यांनी आत्महत्या केली होती. तेव्हापासून रेखा एकट्याच आयुष्य जगत आहेत. रेखा अनेकदा सार्वजनिक ठिकाणी भांगेत सिंदूर लावून दिसतात. त्यामुळे चाहत्यांच्या मनात नेहमीच हा प्रश्न असतो की त्या कोणाच्या नावाचे सिंदूर लावतात? यावर पूर्वी एका मुलाखतीत रेखा यांनी सांगितले होते की, सिंदूर लावणे हे त्यांच्यासाठी एक 'स्टाईल स्टेटमेंट' आहे. तरीही रेखा यांचे आयुष्य आजही लोकांसाठी एका गूढ रहस्यासारखेच आहे.