बेपत्ता मुलींना कशी वाचवणार शिवानी? राणी मुखर्जीच्या 'मर्दानी ३'चं पहिलं पोस्टर समोर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 09:04 IST2026-01-11T09:03:57+5:302026-01-11T09:04:34+5:30
'मर्दानी ३'चं पहिलं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं असून सिनेमाची रिलीज डेटही समोर आली आहे. 'मर्दानी ३' लवकरच सिनेमागृहात प्रदर्शित केला जाणार आहे.

बेपत्ता मुलींना कशी वाचवणार शिवानी? राणी मुखर्जीच्या 'मर्दानी ३'चं पहिलं पोस्टर समोर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार
'मर्दानी १' आणि 'मर्दानी २' या सिनेमांच्या प्रचंड यशानंतर बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी 'मर्दानी ३'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासूनच चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. 'मर्दानी ३'चं पहिलं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं असून सिनेमाची रिलीज डेटही समोर आली आहे. 'मर्दानी ३' लवकरच सिनेमागृहात प्रदर्शित केला जाणार आहे.
'मर्दानी ३'मध्ये राणी मुखर्जी पुन्हा एकदा धाडसी पोलीस अधिकारी शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत दिसणार आहे. न्यायासाठी निस्वार्थपणे लढा देणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका ती साकारणार आहे. 'मर्दानी ३'च्या पोस्टरवर हातात बंदूक घेऊन राणी मुखर्जी बसल्याचं दिसत आहे. तर तिच्या मागे काही मुली उभ्या आहेत. ज्या बेपत्ता आहेत असं सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे. याचा शोध राणी मुखर्जी 'मर्दानी ३'मध्ये घेताना दिसणार आहे. राणी मुखर्जी साकारत असलेल्या शिवानीच्या चांगुलपणाचा आणि भयावह वाईट शक्तींचा रक्तरंजित व हिंसक संघर्ष सिनेमात पाहायला मिळणार असून देशातील अनेक बेपत्ता मुलींना वाचवण्यासाठी ती वेळेशी असणारी शर्यत लढताना दिसणार आहे.
'मर्दानी ३'चे दिग्दर्शन अभिराज मिनावाला यांनी केले असून चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रा यांनी केली आहे. 'मर्दानी १'मध्ये मानव तस्करीच्या भयावह वास्तवावर प्रकाश टाकण्यात आला होता. तर 'मर्दानी २'मध्ये व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या एका मानसिक विकृत सिरीयल रेपिस्टचे भयानक मनोविश्व उलगडण्यात आले होते. 'मर्दानी ३'मध्ये समाजातील आणखी एका अंधाऱ्या आणि क्रूर वास्तवात डोकावणार असून, दमदार आणि मुद्देसूद कथाकथनाची फ्रँचायझीची परंपरा पुढे नेणार आहे. हा सिनेमा येत्या ३० जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे.