'ही काही फॅक्टरी नाहीये...', दीपिका पादुकोणच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर राणा दग्गुबती स्पष्ट मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 13:06 IST2025-12-03T13:05:28+5:302025-12-03T13:06:10+5:30
दीपिकाच्या अटींवर दाक्षिणात्य अभिनेत्यांनी व्यक्त केली मतं

'ही काही फॅक्टरी नाहीये...', दीपिका पादुकोणच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर राणा दग्गुबती स्पष्ट मत
अभिनेत्री दीपिका पादुकोण बीटाऊनमध्ये गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आई झाल्यानंतर आता तिने निर्मात्यांसमोर ८ तासांच्या शिफ्टची अट ठेवली. यावरुन इंडस्ट्रीतून संमिश्र प्रतिक्रिया आल्या. काहींनी दीपिकाची मागणी रास्त असल्याचं सांगितलं. तर काहींनी असहमतीही दर्शवली. विशेषत: दाक्षिणात्य इंडस्ट्रीने दीपिकाविरोधात पवित्रा घेतला. संदीप रेड्डी वांगा यांनी तिला 'स्पिरीट'मधून बाहेर काढलं. तसंच 'कल्कि'च्या सीक्वेलमधूनही दीपिकाचा पत्ता कट करण्यात आला. आता दाक्षिणात्य अभिनेते राणा दग्गुबती आणि दुलकर लमान यांनीही या प्रकरणावर मत मांडलं आहे.
द हॉलिवूड रिपोर्टर इंडियाशी बोलताना राणा दग्गुबती म्हणाला, "टॉम क्रुझ म्हणतो त्याप्रमाणे सिनेमा हे आयुष्य आहे. हे आपल्या सगळ्यांनाच लागू होतं. ही आपली नोकरी नाही तर जीवनशैली आहे. तुम्हाला यात राहायचं असेल तर राहा नाहीतर नका राहू. ही फॅक्टरी नाही ज्यात आम्ही ८ तास बसू आणि सर्वोत्तम सीन देऊ. १५ तास बसूनही चांगला सीन होणार नाही अशीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दरवेळी समीकरण बदलतं. प्रत्येक प्रोजेक्टवर अवलंबून असतं. तसंच प्रत्येक इंडस्ट्रीचीही कामाची पद्धत वेगळी असते. एकमेकांकडून शिकायलाही मिळतं."
तर दुलकर सलमान म्हणाला, "मल्याळम इंडस्ट्रीत तुम्ही फक्त काम करत असता. काम केव्हा संपेल याची तुम्हाला कल्पनाही असते. हे नक्कीच थकवणारं असतं. मी २०१८ मध्ये जेव्हा माझा पहिला तेलुगू सिनेमा केला तेव्हा मी सहा वाजेपर्यंत घरी जायचो. हे माझ्या करिअरमध्ये पहिल्यांदाच घडलं. मी निर्माता होईन तेव्हा गोष्टी वेगळ्या असतील असा मी विचार करायचो. पण वास्तविक पाहता आपण फार काही करु शकत नाही. एका दिवसात जास्तीचे तास काम करणं हे एक दिवस जास्त काम करण्यापेक्षा बरंच आहे."
दीपिका पादुकोण शाहरुख खानसोबत 'किंग' सिनेमात दिसणार आहे. तसंच अॅटलीच्या सिनेमातही तिची एन्ट्री झाली आहे ज्यात अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत असणार आहे. दरम्यान दीपिकाने या सर्व चर्चांवर मत व्यक्त करताना आपण कामाप्रती आणि सिनेमाप्रती प्रामाणिक असल्याचं म्हटलं होतं.