सोनू निगमच्या वादग्रस्त ट्विटनंतर प्रियांका चोप्राचा व्हिडीओ व्हायरल

By Admin | Updated: April 20, 2017 14:24 IST2017-04-20T14:19:33+5:302017-04-20T14:24:46+5:30

एकीकडे सोशल मीडियावर हा वाद चांगलाच पेटला असताना दुसरीकडे अभिनेत्री प्रियांका चोप्राचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे

Priyanka Chopra's Video Viral After Sonu Nigam's controversial tweet | सोनू निगमच्या वादग्रस्त ट्विटनंतर प्रियांका चोप्राचा व्हिडीओ व्हायरल

सोनू निगमच्या वादग्रस्त ट्विटनंतर प्रियांका चोप्राचा व्हिडीओ व्हायरल

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 20 - मशिदीवरील भोंग्यांवरून होणा-या अजानबाबत गायक सोनू निगमने ट्विट केल्यानंतर सुरु झालेला वाद अद्याप संपलेला नाही. या वादाला रोज काही ना काहीतरी नवीन तोंड फुटत आहे. बुधवारी सोनू निगमने पत्रकार परिषद घेत आपली बाजून मांडली. यावेळी त्याने  मुस्लीम मित्राकडून मुंडण करून घेत, मुस्लीम नेत्याने दिलेल्या धमकीला सडेतोड उत्तरही दिले.
 
(फतव्याला उत्तर देत सोनू निगमने मुस्लिम मित्राकडून करुन घेतलं मुंडण)
(मशिदींवरील भोंग्यांविरोधात सोनू निगमचा बिगुल)
 
एकीकडे सोशल मीडियावर हा वाद चांगलाच पेटला असताना दुसरीकडे अभिनेत्री प्रियांका चोप्राचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडीओमध्ये प्रियांका चोप्रा अजानबद्दल बोलत आहे. गंगाजल चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानच्या आठवणी शेअर करत प्रियांका चोप्रा सांगत आहे की, "संध्याकाळी पॅकअप झाल्यानंतर छतावर बसून मी अजान ऐकत असे. मला त्यामुळे खूप शांती मिळत असे". प्रियांकाने सांगितल्यानुसार अजान तिच्या कानामध्ये संगीताप्रमाणे वाजायचं. 
 

सोनू निगमच्या वक्तव्यावर बॉलिवूड सेलिब्रेटिजमध्ये फूट पाहायला मिळाली. एकीकडे संगीत दिग्दर्शक वाजिद खानने सोनूच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. तर गायक मिका सिंहने त्याला घर बदलण्याचा सल्ला दिला आहे. 
 
सोनू निगमने १७ एप्रिल रोजी मशिदीवरील भोंग्याद्वारे होणा-या अजानवर आक्षेप नोंदविणारे ट्विट केले होते. यानंतर पश्चिम बंगालमधील अल्पसंख्याक युनायटेड काउंसिलचे उपाध्यक्ष सय्यद शाह आतेफ अली कादरी यांनी सोनू निगमचे मुंडण करून त्याला जुन्या चपलांचा हार घालणाऱ्याला १० लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. सोनू निगमने आपला मित्र हकिम आलीम याच्याकडून आपले केस कापून घेत, मुस्लीम नेते सय्यद कादरी यांना जशास तसे उत्तर दिले. कादरी यांनी आता दहा लाख रुपये तयार ठेवावेत, असे आवाहनही केले. 
 
बुधवारी सोनू निगमने पत्रकार परिषद घेत बाजू मांडली. ज्या व्यक्तीने संपूर्ण आयुष्यात मोहम्मद रफी यांना वडील मानले, ज्याच्या गुरूचे नाव उस्ताद गुलाम मुस्तफा खान आहे, तो मुस्लीमविरोधी कसा असू शकतो, असा सवाल त्याने केला.
प्रत्येकाला मते मांडण्याचा अधिकार आहे. आपल्या भावनांचा व टिष्ट्वटचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. अजानला नव्हे, तर मशिदीवर कर्कश्श आवाजात वाजणाऱ्या लाउडस्पीकरला माझा विरोध आहे, पण याचा चुकीचा अर्थ लावला. लोक धार्मिक उत्सवाच्या नावाखाली रस्त्यावर उतरतात. मिरवणुकीत गाणे मोठ्या आवाजात वाजवितात, मद्य सेवन करून जनतेला त्रास देतात, असेही सोनू म्हणाला.

मुस्लिम मित्राकडून कापले केस -
सोनू निगमने हेअर स्टायलिस्ट अलीमला भर पत्रकार परिषदेत बोलावून घेतलं आणि केस कापून टक्कल केलं. आलिम हा सेलिब्रिटी हेअरस्टायलिस्ट म्हणून प्रसिद्ध आहे. "सोनू निगमने कोणत्याही विशिष्ट धर्माबत विधान केले नाही. त्याने लाऊडस्पिकरचा मुद्दा उठवला होता", असे म्हणत हेअर स्टायलिस्ट आलिमने सोनू निगमच्या विधानांचं समर्थन केलं आहे.
 
नेमके काय होते ट्विट -
‘मी मुस्लीम नाही, तरीही रोज सकाळी अजानमुळे माझी झोपमोड का? ही बळजबरी कधी थांबणार?’ असा सवाल सोनू निगमने ट्विटरवर केला होता. "मोहम्मद यांनी ज्यावेळी इस्लामची सुरुवात केली, त्या काळात वीज नव्हती. मग एडिसननंतर हा कर्कश आवाज का?, जे लोक धर्माचे अनुयायी नाहीत, त्यांना भोंगे लावून उठवणाऱ्या कोणत्याही मंदिर किंवा गुरुद्वारावर माझा अजिबात विश्वास नाही", असंही ट्वीट सोनू निगमनं केलं होतं.
 
अजान म्हणजे काय?
नमाज अदा करण्याआधी मस्जिदमध्ये लोकांना बोलवण्यासाठी अजान दिली जाते. अजानचा अर्थ बोलावणं किंवा घोषणा करणं असा होतो. नमाजच्या आधी दिवसातून पाच वेळा अजान दिली जाते.
 

Web Title: Priyanka Chopra's Video Viral After Sonu Nigam's controversial tweet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.