आता परत सलमानवर जोक करणार का? पापाराझीच्या प्रश्नावर प्रणित मोरेने हातच जोडले; म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 11:49 IST2025-12-12T11:49:13+5:302025-12-12T11:49:58+5:30
सलमान खानचं नाव ऐकताच प्रणित मोरे म्हणाला...

आता परत सलमानवर जोक करणार का? पापाराझीच्या प्रश्नावर प्रणित मोरेने हातच जोडले; म्हणाला...
'बिग बॉस १९' काही दिवसांपूर्वीच संपलं. गौरव खन्ना या सीझनचा विजेता झाला तर फरहाना भट रनर अप ठरली. मराठमोळा स्टॅण्डअप कॉमेडियन प्रणित मोरे तिसऱ्या क्रमांकावर होता. प्रणितने आपल्या साधेपणाने, कॉमेडीने सर्वांचं मन जिंकलं होतं. सुरुवातीला सलमान खानने प्रणितला सुनावलं होतं. प्रणितने याआधी सलमानवर जोक्स केले होते यावरुन सलमानने त्याची खरडपट्टी काढली होती. आता पुन्हा सलमानवर जोक करणार का? यावर प्रणितने उत्तर दिलं आहे.
'बिग बॉस १९'संपल्यानंतर सर्व स्पर्धक पुन्हा भेटले. प्रणित मोरे आणि अभिषेक यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. पापाराझी प्रणितला विचारतात, 'आता परत सलमानवर व्हिडीओ बनवणार का?' यावर प्रणित हसतच हातच जोडले. तेव्हा अभिषेक म्हणाला, 'वो नही माफ करेंगे'. यावर प्रणित गंमतीत म्हणाला , 'मी खूश राहावं असं तुम्हाला वाटत नाही ना. अच्छे है यार सलमान भाई बहुत अच्छे है'.
प्रणित आणि अभिषेक बजाजच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केली आहे. 'अखेर दोघांचं पॅचअप झालं' अशी प्रतिक्रिया दिली आहे. घरात असताना प्रणित आणि अभिषेकमध्ये भांडण होतं. मात्र आता बिग बॉस संपल्यानंतर दोघंही सगळं विसरुन पुन्हा मित्र झाले आहेत. आता प्रणितचा बिग बॉसवर कोणता कंटेंट व्हिडीओ येतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसंच त्याच्या आगामी कॉमेडी शोजचीही चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
बिग बॉस हिंदी संपताच आता लवकरच 'बिग बॉस मराठी' सीझन ६ सुरु होणार आहे. रितेश देशमुखचा या सीझनचा होस्ट असणार आहे. यंदाच्या सीझनमध्ये कोणते स्पर्धक येणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.