"आज भी जी करदा है..."; धर्मेंद्र यांनी स्वतः लिहिलेली कविता, 'इक्कीस' सिनेमातील डोळ्यात पाणी आणणारा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 12:14 IST2025-11-28T12:11:56+5:302025-11-28T12:14:13+5:30
धर्मेंद्र आणि असरानी या दोन दिग्गज अभिनेत्यांना इक्कीस सिनेमात पाहून चाहते भावुक झाले आहेत. तुम्हीही बघा हा व्हिडीओ

"आज भी जी करदा है..."; धर्मेंद्र यांनी स्वतः लिहिलेली कविता, 'इक्कीस' सिनेमातील डोळ्यात पाणी आणणारा व्हिडीओ
धर्मेंद्र यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. धर्मेंद्र यांच्या निधनामुळे सर्वांना धक्का बसला. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सध्या सर्वांना उत्सुकता आहे ती म्हणजे त्यांच्या 'इक्कीस' सिनेमाची. या सिनेमात धर्मेंद्र शहीद जवान मेजर अरुण खेत्रपाल यांच्या वडिलांची भूमिका धर्मेंद्र साकारत आहेत. त्यानिमित्ताने 'इक्कीस' सिनेमातील एक खास व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत धर्मेंद्र यांनी स्वतः लिहिलेली एक कविता दिसतेय.
धर्मेंद्र यांनी लिहिलेली कविता आणि भावुक व्हिडीओ
मॅडॉक फिल्मसने 'इक्कीस' सिनेमातील धर्मेंद्र यांचा खास व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. विशेष म्हणजे धर्मेंद्र यांनी स्वतः लिहिलेली कविता या व्हिडीओत दिसतेय. धर्मेंद्र लिहितात, "आज भी जी करदा है, पिंड अपने नू जावा.” या ओळी असलेली ही कविता अत्यंत भावुक आहे. प्रत्येकाला आपल्या गावाची, गावातील घराची आणि कुटुंबाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. धर्मेंद्र यांच्या उत्कृष्ट अभिनयाची झलक या व्हिडीओत दिसतेय. आज धर्मेंद्र आपल्यात नाहीत त्यामुळे ही कविता ऐकून आणि हा व्हिडीओ बघून अनेकांचे डोळे पाणवतील.
विशेष म्हणजे, धर्मेंद्र यांच्यासोबत अभिनेते असरानी यांचीही झलक या व्हिडीओत दिसतेय. असरानी यांचंही काही दिवसांपूर्वी निधन झालं. 'शोले' गाजवणाऱ्या या दोन अभिनेत्यांना शेवटचं एकत्र बघून चाहते भावुक झाले आहेत. श्रीराम राघवन दिग्दर्शित 'इक्कीस' हा सिनेमा २५ डिसेंबरला रिलीज होणार आहे. अगस्त्य नंदा, धर्मेंद्र, जयदीप अहलावत या कलाकारांच्या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत.