प्रजासत्ताक दिनाला जोडून आलेल्या वीकेंडचा करा उपयोग, OTT वर 'या' सिनेमा अन् सीरिजचा धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 04:36 PM2024-01-26T16:36:53+5:302024-01-26T16:46:35+5:30

रणबीरचा Animal तर आलाच आणखी ओटीटीवर काय पाहण्यासारखं आहे वाचा

प्रजासत्ताक दिवस आणि नंतर वीकेंड अशा जोडून सुट्ट्या आल्याने काय करायचं असा प्रश्न पडतोच. तेव्हा घरबसल्या ओटीटीवर आलेला नवीन कंटेंट तुम्ही नक्कीच पाहू शकता. रोमान्स, देशभक्ती, कॉमेडी, थ्रिलर असा सर्वच मसाला आपण घरबसल्या एका क्लिकवर पाहू शकतो. बघुया कोणत्या नवीन सिनेमांची आणि वेबसीरिजची सध्या ओटीटीवर चर्चा आहे.

2023 मधील सर्वात चर्चेतील आणि वादग्रस्त सिनेमा म्हणजे Animal. रणबीर कपूरचा दमदार अभिनय आणि बॉबी देओलचा भयानक अवतार यामुळे सिनेमा चर्चेत होता. थिएटर रिलीजनंतर Animal जवळपास दोन महिन्यांनी आजच ओटीटीवर आला आहे. पैसे देऊन थिएटरमध्ये हा सिनेमा पाहण्याची इच्छा नाही म्हणून तु्म्ही पाहिला नसेल तर नेटफ्लिक्सवर आज पाहू शकता.

Animal ला टक्कर देत विकी कौशलचा 'सॅम बहादुर' सिनेमाही त्याच दिवशी म्हणजे 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. विकी कौशलने यामध्ये भारताचे पहिले फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांची भूमिका साकारली. विकीच्या अभिनयामुळे प्रेक्षक अक्षरश: भारावून गेले. आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सिनेमा 'झी 5' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.

70s च्या दशकातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री रवीना टंडननेही ओटीटीवर पदार्पण केलं आहे. 'कर्मा कॉलिंग' ही तिची पहिली वेबसीरिज आजच हॉटस्टारवर प्रदर्शित झाली आहे.यामध्ये तिने अलीबागची राजमाता इंद्राणी कोठारीची भूमिका निभावली आहे. मर्डर, बदला अशा थ्रिलर विषयावर सीरिजची कहाणी आधारित आहे.

'फाईट क्लब' या सिनेमाच्या रिलीजचीही सगळे वाट पाहत आहेत. 27 जानेवारीला सिनेमा रिलीज होतोय. याची कहाणी एका तरुणावर आधारित आहे ज्याला फुटबॉल खेळाडू बनण्याची इच्छा असते. मात्र एका भांडणामुळे त्याचं आयुष्यच बदलतं. तो अंग्री मॅनच्या भूमिकेत कसा येतो यावर सिनेमा आधारित आहे.

सुपरस्टार मोहनलाल यांची 'नेरु' ही दाक्षिणात्य फिल्मही ओटीटीवर आली आहे. एका दृष्टिहीन मूर्तीकारावर सिनेमाची कहाणी आधारित आहे जो न्यायासाठी लढा देत असतो. सिनेमात प्रियमणि, शांति आणि जगदीश यांचीही भूमिका आहे तर मोहनलाल मुख्य भूमिकेत आहेत. हॉटस्टारवर सिनेमा रिलीज झाला आहे.

हॉलिवूड सिनेमा पाहायची इच्छा असल्यास अॅक्वामेन:एंड द लॉस्ट किंग्डम' ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. जेसन मोमोआने जबरदस्त अभिनयाने सर्वांना आश्चर्यचकित केलंय. बुक माय शो स्ट्रीमवर सिनेमा रिलीज झाला आहे.