'बडे अच्छे लगते है'चा रिमेक? नव्या मालिकेबाबतीत तेजश्री प्रधान म्हणाली, "गाजलेल्या गोष्टीचा..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 12:13 IST2025-08-12T11:40:25+5:302025-08-12T12:13:50+5:30
तेजश्री प्रधानची याआधीची 'प्रेमाची गोष्ट' मालिकाही हिंदी मालिकेचा रिमेक होती असं बोललं गेलं. आता नवी मालिकाही हिंदीचीच कॉपी आहे अशी चर्चा झाली.

तेजश्री प्रधानची (Tejashri Pradhan) 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिका सुरु झाली आहे. सुबोध भावेसोबत ती दिसत आहे. या मालिकेतून ती बऱ्याच काळानंतर झी मराठीवर परत आली आहे.
याआधी ती स्टार प्रवाहवर 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत दिसत होती. ती मालिका तिने अचानक अर्धवटच सोडली. 'प्रेमाची गोष्ट'मालिका ही 'ये है मोहोब्बते' या गाजलेल्या हिंदी मालिकेचा रिमेक आहे अशी चर्चा झाली.
तर आता तेजश्रीचीच 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिका 'बडे अच्छे लगते है'चा रिमेक आहे अशी चर्चा सुरु आहे. अखेर यावर तेजश्रीने उत्तर दिलं आहे.
'नवशक्ती'ला दिलेल्या मुलाखतीत तेजश्री म्हणाली, "आपलं मनोरंजनविश्व खूप जुनं आहे. यात आपण भावनांबद्दल बोलतो. या भावना सारख्याच आहेत. फक्त त्या वेगवेगळ्या पद्धतीने मांडल्या जातात."
"त्यामुळे इतकी वर्ष झाल्यानंतर आपल्या हे त्याच्यासारखं, ते याच्यासारखं हे कुठे ना कुठे वाटणारंच आहे. त्यात टीव्ही हे वर्षानुवर्ष चालणारं सगळ्यात जास्त डॉमिनेटिंग माध्यम आहे. त्यामुळे हे होणारंच आहे."
"पण तरी ती मांडण्याची, सादर करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी असणार आहे. त्यातले बारकावे वेगळे असणार आहेत. त्यामुळे कितीही वेळा असं झालं की हा याचा रिमेक, तो त्याचा रिमेक होणारत आहे. तरी मी कायम सांगते की कदाचित एका वेगळ्या भाषेचा रिमेक होत असला तरी त्या त्या भाषेची संस्कृती वेगळी असते."
"त्या त्या भाषेची जडण घडण, सण वेगळे असतात. ते साजरं करायची पद्धत वेगळी असते. त्यामुळे तुम्हाला कदाचित त्याचं वन लाईन मिळेल की हे जे चालू आहे ते तिथेही झालं होतं. पण ते सादर करण्याची पद्धत नक्कीच वेगळी असणार आहे."
"आज आपण एकाच चॅनलच्या अंतर्गत अनेक भाषा एक्स्प्लोर करत आहोत. हे भारतीयांसाठी किती चांगली गोष्ट आहे. एखाद्या भाषेत गाजलेली गोष्ट आपण दुसऱ्या भाषेत बोलू शकणार असू तर ही चांगलीच गोष्ट आहे. ती चांगल्या पद्धतीने स्वीकारली पाहिजे."
"कॉपी करतोय म्हणजे ती फ्रेम टू फ्रेम कॉपी होईल असं नाही. बराच फरक कायम असणारच आहे. यापुढेही हे होत राहणार आहे. प्रत्येकातला वेगळेपणा काढण्यासाठी क्रिएटिव्ह्ज प्रयत्न करत आहेत. त्यामुळे तुम्हाला तेवढीच मजाही येणार आहे."