लोकल ट्रेनमध्ये ड्रेस मटेरियल विकायची 'ही' मराठी अभिनेत्री, 'कॉमेडी ते खलनायिका' असा आहे प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 14:23 IST2026-02-10T14:11:00+5:302026-02-10T14:23:29+5:30
तो माझा स्ट्रगलचा काळ कमालीचा होता..., कोण आहे ही अभिनेत्री?

मराठी इंडस्ट्रीत कलाकारांनी अनेकदा त्यांच्या स्ट्रगलची कहाणी सांगितली. अशीच एक अभिनेत्री जी आधी कॉमेडीत गाजली आणि आता ती खलनायिका म्हणूनही प्रसिद्ध आहे.

'फु बाई फु', 'कॉमेडीची बुलेट ट्रेन','महाराष्ट्राची हास्यजत्रा' आणि हिंदीत 'कॉमेडी सर्कस'मध्येही ती दिसली. तर स्टार प्रवाहवरील एका मालिकेत ती खलनायिका म्हणून प्रसिद्धीझोतात आली.

ही आहे अभिनेत्री विशाखा सुभेदार. मराठी नाटक, मालिका, टीव्ही शो आणि सिनेमा अशा सगळ्या माध्यमांमध्ये विशाखा सुभेदारने काम केलं आहे. नुकतंच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत तिने करिअरच्या सुरुवातीच्या संघर्षाबद्दल सांगितलं.

ती म्हणाली, "माझं १९९८ मध्ये लग्न झालं. तेव्हापासून मी अंबरनाथमध्येच आहे. सुरुवातीला मला अभिनय क्षेत्रात उतरता आलं नव्हतं. कारण माझी आणि नवऱ्याची दोघांची आर्थिक परिस्थिती तेवढी बरी नव्हती. दोघंही स्ट्रगल करतोय असं करुन भागणार नव्हतं."

"एकाला स्थिर पगार गरजेचा होता. त्यामुळे मी तसंही शाळेत नोकरी करत होते. मी स्वत:चं पार्लर सुरु केलं होतं. ठाणे, बदलापूर, अंबरनाथमध्ये मी डान्स शिकवायलाही जायचे."

"आईचंच पार्लर आहे त्यामुळे घरच्या घरी तो व्यवसाय सुरु झाला होता. आकाशवाणीलाही मी जायचे. जाता-येता मी उल्हासनगवरुन सामान उचलायचे आणि लोकल ट्रेनमध्ये ड्रेस मटेरियल वगैरे विकायचे."

"आकाशवाणीमध्येही वरच्या पोस्टच्या मॅडम वगैरे होत्या त्याही खरेदी करायच्या. लिपस्टिक, नेलपेंट याच्या ऑर्डरही घ्यायचे. ते सामान येता जाता घेऊन ते विकायचे. तो माझा स्ट्रगलचा काळ कमालीचा होता."

"२००८-०९ पर्यंत मी अंबरनाथला जाऊन येऊन हे सगळं करत होते. अगदी फू बाई फू पर्यंत मी हे करत होते. नंतर मी अंधेरीत शिफ्ट झाले. कारण मला तिथून शूटिंग जवळ पडायचं. त्यानंतर पक्के शेजारी चं शूट करत होते तेव्हा मी मालाडला राहायचे. आता मी मुलूंडमध्ये आहे."

















