जणू साक्षात लक्ष्मी-नारायणाचा जोडा! रश्मिका आणि विजयच्या लग्नाचे फोटो पाहून चाहत्यांनी ओवाळून टाकली नजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 20:16 IST2026-02-26T19:59:55+5:302026-02-26T20:16:43+5:30
रश्मिका आणि विजयच्या लग्नाचे पहिले फोटो समोर येताच सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, चाहत्यांनी या जोडीला 'लक्ष्मी-नारायणाचा जोडा' अशी उपमा दिली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून ज्या क्षणाची संपूर्ण देश वाट पाहत होता, तो क्षण अखेर आला आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील 'पॉवर कपल' विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना आज, २६ फेब्रुवारी २०२६ रोजी राजस्थानच्या उदयपूरमध्ये विवाहबंधनात अडकले आहेत.

रश्मिका आणि विजयच्या लग्नाचे पहिले फोटो समोर येताच सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, चाहत्यांनी या जोडीला 'लक्ष्मी-नारायणाचा जोडा' अशी उपमा दिली आहे.

विजय आणि रश्मिकाचा विवाह सोहळा केवळ एका पद्धतीत मर्यादित नव्हता, तर तेलुगू आणि कोडावा (कुर्ग) या दोन्ही परंपरांचे पालन करून हा शाही विवाह पार पडला. रश्मिकाच्या कोडावा संस्कृतीतील विधींनी लग्नाचे वेगळेपण अधोरेखित केले.

लग्नाचे फोटो शेअर होताच 'विरोश'च्या लूकची चर्चा रंगली आहे. पारंपारिक दाक्षिणात्य वेशभूषेत दोघेही अत्यंत मोहक दिसत आहेत.

रश्मिकाने शाही लाल रंगाची भरजरी रेशमी साडी परिधान केली आहे. साडीवर सोनेरी जरीची नाजूक नक्षी असून तिचा ब्लाउज जड भरतकामाने सजवलेला आहे.

रश्मिकाच्या गळ्यात चोकर आणि लांब हार, कानात मोठे झुमके, हातात बाजूबंद आणि कंबरपट्टा अशा पारंपरिक दागिन्यांनी तिचा संपूर्ण लूक अधिक उठून दिसत आहे. केसांमध्ये माथापट्टी घालून तिने आपला लूक पूर्ण केला आहे.

विजयने पांढऱ्या रंगाची वेष्टी परिधान केली होती. त्यासोबत त्याने लाल रंगाचे उपरणे घेतले होते. या उपरण्यावर जंगल आणि मंदिर प्रेरित नक्षीचे सूक्ष्म भरतकाम केलेले होते.

विजय देवरकोंडाचा लूक अक्षरशः डोळे दिपवणारा ठरला. पारंपारिक वेशभूषेला दागिन्यांची जोड मिळाल्यामुळे तो एखाद्या 'राजपुत्रा'सारखा दिसत होता. हातातील पारंपरिक कडे आणि दंडात घातलेला बाजूबंद यामुळे त्याच्या लूकला एक ऐतिहासिक आणि दिमाखदार लूक प्राप्त झाला.

विवाहसोहळ्यातील पारंपरिक विधीनुसार विजयने खांद्यावर घेतलेले उपरण्याची गाठ रश्मिकाच्या साडीच्या पदराशी बांधण्यात आली. या विधीला खास धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असते. वधू-वरांच्या आयुष्याची गाठ एकमेकांशी घट्ट बांधली गेली आहे, याचे हे प्रतीक मानले जाते.

रश्मिकाच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि विजयचा राजेशाही थाट पाहून चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. लग्नाचे फोटो शेअर करताना विजय देवरकोंडाने रश्मिकासाठी एक अत्यंत हृदयस्पर्शी पोस्ट लिहिली आहे.

विजयनं लिहलं, "एके दिवशी मला तिची एवढी आठवण येत होती की वाटलं, आज ती माझ्याबरोबर असती तर दिवस किती छान गेला असता... आम्ही एकत्र असतो तेव्हा मला जेवताना दोन घास जास्त जातात. जेव्हा आम्ही एकत्र वर्कआऊट करतो, तेव्हा व्यायाम करणं शिक्षा वाटत नाही. माझ्या आयुष्यात कायम तिची गरज होती. म्हणूनच, माझ्या सगळ्यात जवळच्या मैत्रिणीला आज मी माझी बायको बनवलंय. २६ फेब्रुवारी २०२६".

रश्मिकाने सुद्धा लग्नाचे फोटो शेअर करत याला 'My Husband' असं कॅप्शन दिलं आहे. तिनं लिहलं, "मला खरं प्रेम काय असतं ते शिकवलं, मनःशांती म्हणजे काय ते जाणवून दिलं आणि मोठी स्वप्न पाहायला शिकवलं. मी आज ती स्त्री बनले आहे, जिचं मी नेहमी स्वप्न पाहिलं होतं, कारण तूच तिला घडवलं आहेस! मी खरोखरच खूप नशीबवान आहे. विज्जू, तुझ्याबद्दलच्या माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे नेहमीच शब्दांची कमतरता असते!! मी तुला हे नेहमी सांगत आले आहे. आज माझ्या आयुष्यातील प्रत्येक संघर्ष, प्रत्येक आनंद याला अर्थ मिळाला आहे. तुझी पत्नी मिरवण्यासाठी मी खूप उत्सुक आहे", असे म्हणत रश्मिकानं आनंद व्यक्त केला.

आता उदयपूरमध्ये थाटामाटात लग्नसोहळा पार पडल्यावर विजय-रश्मिकाने ४ मार्चला त्यांच्या वेडिंग रिसेप्शनचं आयोजन हैदराबादमध्ये केलं आहे. याठिकाणी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित राहणार आहेत.

















