"मला तर लग्न करायचंय पण...", प्रेमाबद्दल प्रियदर्शिनीने मांडलं सध्याचं भयाण वास्तव, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 11:44 IST2026-02-05T11:20:35+5:302026-02-05T11:44:07+5:30

प्रियदर्शिनीला वाटतेय लग्नाची भीती? कारण सांगत म्हणाली...

मराठी सिनेसृष्टीतील 'फुलराणी' प्रियदर्शिनी इंदलकरने नुकतंच प्रेम, लग्न यावर भाष्य केलं. हास्यजत्रेतून सर्वांना खळखळून हसवणाऱ्या प्रियदर्शिनीला लग्न करायची इच्छा आहे पण सध्याची परिस्थिती पाहता तिची द्विधा मन:स्थिती झाली आहे.

'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत प्रियदर्शिनी म्हणाली, "आज सोशल मीडियावर १० पोस्ट पाहिल्या तर एक पोस्ट म्हणते की प्रेम सगळं काही आहे. दुसरी पोस्ट म्हणते की प्रेमात आंधळे होऊ नका, करिअरकडे लक्ष द्या."

"पुढची पोस्ट म्हणते की आत्मसन्मान महत्वाचा आहे प्रेम वगैरे सगळं नंतर... पुढे कपल्सवर एखादी कॉमेडी रील दिसते तर कधी कपल्सचे सुंदर फोटो पाहून आपल्यालाही असा पार्टनर हवा असं वाटतं."

"एवढी स्वप्न दाखवणारं सोशल मीडिया झालं आहे. एक खोटं जग आपल्या समोर तयार होतं. त्यामुळे लग्नाचा निर्णय घेणं आता आणखी कठीण झालं आहे. कारण एका निर्णयावर ठामच राहता येत नाही. खूप फाटे फुटतात."

"सोशल मीडियावर आपलं इतकं ब्रेन रॉटिंग सुरु आहे त्यामुळे आपल्या पिढीला आता आयुष्यातला इतका मोठा निर्णय घेणं खूप कठीण झालं आहे. आत्ताच्या पिढीलाच हे इतकं कठीण जातंय पुढच्या पिढीचं काय होणार?"

त्यात घटस्फोटाचं प्रमाणही वाढत आहे. तुम्ही जर वयाची तिशी ओलांडली असेल आणि अविवाहित असाल तर तुम्ही एक घटस्फोट चुकवला असं सध्या म्हटलं जातं.कारण अनेक असे लोक आहेत ज्यांनी पंचविशीत लग्न केलंय आणि ३० व्या वर्षी त्यांचा घटस्फोट झालाय. ही खूप भयानक परिस्थिती आहे. "

"पण तरी प्रेम, लग्न याबद्दल मी अजूनही आशावादी आहे. मला तर नक्कीच लग्न करायचंय पण एकंदर सगळी परिस्थिती पाहता जरा द्विधा मन:स्थिती आहे."

प्रियदर्शिनी इंदलकर सध्या २८ वर्षांची आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून ती घराघरात पोहोचली. सध्या ती अनेक मराठी सिनेमांमध्येही मुख्य भूमिका साकारत आहे.