टी.व्ही. रिपोर्टर ते अभिनेत्री! ‘असा’ होता पार्थना बेहेरेचा करिअर प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 01:35 PM2024-01-05T13:35:37+5:302024-01-05T13:54:59+5:30

आघाडीची अभिनेत्री होण्याचा पार्थनाचा प्रवास.

आपल्या अभिनयाच्या जोरदार प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहेरे. प्रार्थनाने तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यानेदेखील चाहत्यांना भुरळ पाडली.

प्रार्थना कायमच प्रेक्षकांमध्ये चर्चेत असते. आज प्रार्थना ४१ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त आज आपण तुम्हाला माहिती नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात.

अभिनय क्षेत्रात येण्या अगोदर पार्थना ही टी.व्ही. रिपोर्टर होती. . न्यूज रिपोर्टींग दरम्यान तिची भेट एकदा रेणूका शहाणे यांच्यासोबत झाली. त्यावेळी रेणूका यांनी तिला 'रिटा' या सिनेमासाठी असिस्टंट डिरेक्टरसाठी विचारलं. त्यानंतर प्रार्थनाने त्यांना रिटा या सिनेमासाठी असिस्ट केलं. रिटामध्ये प्रार्थनाने अनुराधा साळवी नावाची छोटीशी भूमिकाही केली होती.

तिने झी टी.व्ही.च्या 'पवित्र रिश्ता' साठी ऑडिशन दिली आणि तिची निवड झाली. 'पवित्र रिश्ता' मधील तिच्या वैशाली या पात्राने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. मालिकेतून ती घराघरात लोकप्रिय झाली.

यानंतर पार्थनाने बॉलिवुडमध्येही काम केलं. 'लव्ह यू मिस्टर कलाकार' या चित्रपटात अमृता राव आणि तुषार कपूरबरोबर ती झळकली. तर करिना कपूर आणि सलमान खान यांच्या 'बॉडीगार्ड' या बॉलिवुडच्या सुपरहीट चित्रपटात ती पाहायला मिळाली. यानंतर तिने मराठी सिनेमातही काम करण्यास सुरुवात केली.

पार्थनाने 'वक्रतुंड महाकाय' या मराठी चित्रपटातील तिच्या अभिनयाचे विशेष कौतुक झालं. यानंतर ती 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा', 'मितवा' , 'कॉफी आणि बरंच काही', 'मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस सदाचारी', 'फुगे' ,अशा अनेक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आहे.

तिच्या लव्ह लाईफबद्दल बोलायचे झाल्यास, प्रार्थना बेहरे हिने अभिषेक जावकरसोबत १४ नोव्हेंबर २०१७ रोजी लग्नगाठ बांधली. प्रार्थना बेहेरेचं अरेंज मॅरेज असून तिने आपल्या आई-वडिलांच्या पसंतीच्या मुलाशी लग्न केले आहे. अभिषेक जावकर हा लेखक, दिग्दर्शक, निर्माता आहे. आता दोघांचाही संसार आनंदात सुरू आहे.

प्रार्थनाची 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. प्रार्थना लवकरच एका चांगल्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

शिवाय, अभिनेत्रीने नवी इनिंग सुरू केली आहे. प्रार्थनाने स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे. प्रार्थनाने नणंदेसोबत मिळून साड्यांचा ब्रँड सुरू केला आहे. 'वी नारी' असे या ब्रँडचे नाव आहे.

प्रार्थना सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि ती या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांना अपडेट देत असते.