२०२२ मध्ये या कलाकारांच्या निधनामुळे मराठी सिनेइंडस्ट्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 06:00 AM2022-12-31T06:00:00+5:302022-12-31T06:00:00+5:30

२०२२ वर्ष आता सरलं आहे. अनेक घडामोडी वर्षभरात पाहायला मिळाल्या. तर अनेक दिग्गज मराठी कलाकारांनी या वर्षी जगाचा दुःखद निरोप घेतला.

वर्षाच्या सुरूवातीलाच ११ जानेवारीला दिग्गज अभिनेत्री रेखा कामत यांचं निधन झालं. गेली कित्येक वर्षे त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर गारूड केलं होतं. त्या ९० वर्षांच्या होत्या.

तर १८ जानेवारी २०२२ला लागीर झालं जी या झी मराठी वाहिनीच्या लोकप्रिय मालिकेतील अभिनेता ज्ञानेश माने याचं अपघाती निधन झालं. त्याच्या अचानक जाण्याने मालिकेती कलाकारांसह प्रेक्षकही दुःख व्यक्त करत होते.

त्यानंतर २ फेब्रुवारी २०२२ ला दिग्गज अभिनेते रमेश देव यांचंही निधन झालं. वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

यावर्षी फेब्रुवारी महिन्यात गाणसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने सारं कलाविश्व हळहळलं होतं. त्या ९२ वर्षांच्या होत्या.

अभिनेते प्रदिप पटवर्धन यांचंही ९ ऑगस्ट २०२२ रोजी निधन झालं. वयाच्या ६४ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं अचानक निधन झालं.

तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे जाधवचा १३ नोव्हेंबर २०२२ ला अपघाती मृत्यू झाला. तिच्या अचानक जाण्याने साऱ्यांनाच धक्का बसला. कल्याणी फक्त ३२ वर्षांची होती.

मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत नाव कमावलेले अभिनेते सुनील शेंडे यांचंही १५ नोव्हेंबर २०२२ ला निधन झालं. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंचंही २६ नोव्हेंबर २०२२ रोजी पुण्यात निधन झालं. काही काळ आजाराशी झुंझ दिल्यानंतर त्यांचं निधन झालं. ते ७७ वर्षांचे होते.

ज्येष्ठ नाट्यकर्मी मोहनदास सुखटणकर यांचं ६ डिसें६र २०२२ ला निधन झालं. एकेकाळी नटसम्राट अशी त्यांची ओळख होती. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

तर १५ डिसेंबर २०२२ ला आभाळमाया फेम अभिनेते पराग बेडेकर यांचं अचानक निधन झालं. झोपेतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. वयाच्या अवघ्या ४७ व्या वर्षीच त्यांनी जगाचा निरोप घेतला.