६२व्या वाढदिवशी ६२ तोळ्याची सोन्याची माळ; रमेश देव यांनी पत्नी सीमा यांना दिलेलं खास गिफ्ट, तुम्हाला माहितीये का किस्सा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2023 01:21 PM2023-08-24T13:21:05+5:302023-08-24T13:38:41+5:30

Seema Deo Passed Away : ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं आज(२४ ऑगस्ट) वृद्धापकाळाने निधन झालं आहे. सीमा देव आणि रमेश देव यांची लव्हस्टोरी एव्हरग्रीन होती.

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं आज(२४ ऑगस्ट) वृद्धापकाळाने निधन झालं आहे. त्या ८१ वर्षांच्या होत्या. बऱ्याच दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांना अल्झायमर आजाराने ग्रासलं होतं. त्यांच्या निधनाने मनोरंजनविश्वावर शोककळा पसरली आहे.

सीमा देव यांनी १९५७ साली 'आलिया भोगासी' या मराठी चित्रपटातून सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. या चित्रपटात त्यांनी रमेश देव यांच्या बहिणीची भूमिका साकारली होती. त्यांचे ‘जगाच्या पाठीवर’, ‘मोलकरीण’, ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘या सुखांनो या’, ‘सुवासिनी’, ‘हा माझा मार्ग एकला’ हे चित्रपट प्रचंड गाजले. त्यांनी मराठीबरोबरच त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही नाव कमावलं होतं.

सीमा देव यांनी दिवंगत अभिनेते रमेश देव यांच्यासह लग्नगाठ बांधत संसार थाटला होता. त्यांचं एकमेकांवर अतोनात प्रेम होतं. कलाविश्वातील त्यांची जोडी सुपरहिट होती. ‘एव्हरग्रीन लव्ह स्टोरी’ म्हणून त्यांच्या लव्हस्टोरीकडे पाहिलं जायचं. त्या दोघांनी अनेक चित्रपटांत एकत्र स्क्रीन शेअर केली होती.

२०१३साली रमेश देव आणि सीमा देव यांनी मोठ्या उत्साहात लग्नाचा ५०वा वाढदिवस साजरा केला होता. त्यानंतर एका मुलाखतीत “माझा शेवटचा श्वास तुझ्या मांडीवर सोडावा, ही माझी एकच इच्छा आहे,” असं रमेश देव म्हणाले होते. तेव्हा त्या भावुक झाल्या होत्या.

सीमा देव यांच्या ६२व्या वाढदिवशी रमेश देव यांनी त्यांना ६२ तोळ्याची सोन्याची माळ भेट म्हणून दिली होती. एका मुलाखतीत त्यांनी हा किस्सा सांगितला होता. “लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी माझ्या खिशात फक्त १५०-२०० रुपये होते. पत्नीला काहीतरी गिफ्ट द्यायला पाहिजे, असं सारखं माझ्या मनात येत होतं. एके ठिकाणी सेल लागला होता. त्या सेलमधून मी तिच्या आवडीच्या रंगाची ८० रुपयांची साडी तिला गिफ्ट केली होती.”

“तिच्या ६२व्या वाढदिवशी मी तिला ६२ तोळ्यांची सोन्याची माळ भेट म्हणून दिली होती. जेव्हा पैसे नव्हते तेव्हा ८० रुपयांची साडी भेट केली. पण, जेव्हा पैसे होते तेव्हा तिला सोन्याची माळ मी गिफ्ट केली होती,” असं रमेश देव म्हणाले होते.

रमेश देव यांचं फेब्रुवारी २०२२मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. सीमा देव व रमेश देव यांची अजिंक्य व अभिनय ही मुलेही अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. सीमा देव यांच्या निधनावर कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी श्रद्धांजली वाहिली आहे.