ऋतुजा बागवे 'असं' करते मनी मॅनेजमेंट, कमी वयात स्वत:चं घर आणि रेस्टॉरंटही उघडलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 17:45 IST2025-09-09T17:23:28+5:302025-09-09T17:45:54+5:30

ऋतुजाने हे मोठं यश तिच्या उत्तम आर्थिक नियोजनामुळे मिळवलं आहे, ज्याबद्दल तिने नुकताच खुलासा केला आहे.

ऋतुजा बागवे (Rutuja Bagwe) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

तिने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा माध्यमात काम केले आहे. सध्या ती हिंदी मालिकेत काम करत आहे.

ऋतुजाने व्यवसाय क्षेत्रातही पदार्पण केलंय. अलिकडेच तिने फुडचं पाऊल (Foodch paool) नावाचं हॉटेल सुरू केलं.

ऋतुजा बागवेनं कमी वयातच स्वतःचं हक्काचं घर आणि एक रेस्टॉरंट उघडून सर्वांनाच आश्चर्यचकित केलंय.

हे मोठं यश तिने तिच्या उत्तम आर्थिक नियोजनामुळे मिळवलं आहे, ज्याबद्दल तिने नुकताच खुलासा केला आहे.

ऋतुजा बागवेनं नुकतंच 'आरपार' यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. याच मुलाखतीत ऋतुजाने तिच्या आर्थिक बचतीचा खास फंडा सांगितला.

ऋतुजा बागवे म्हणाली, "माझा मूळ स्वभाव असा आहे की मला खूप खर्च करायला आवडत नाही. अनाठायी खर्च करू नये, असं मला आईने आधीपासून सांगितलेलं आहे. असं म्हणतात की, कमाईतील ४० टक्के बचत करावी आणि ६० टक्के वापरावे. तर मी याउलट करते. मी माझ्या कमाईतील ४० टक्के वापरते आणि ६० टक्के बचत करते".

पुढे तिनं सांगितलं, "जेव्हा मी एकांकिका स्पर्धा जिंकायला लागले, तर त्यातीलसुद्धा काही पैसे मी काढून ठेवायचे, कारण आमच्या घरी ही सवय लावलेली होती. एकांकिका स्पर्धा जिंकली तर त्यातून एकांकिकेसाठी लागणाऱ्या गोष्टी घ्यायच्या. पुढच्या एकांकिकेची एन्ट्री फी भरायची. तर ती सगळी गणितं आधीपासूनच सुरू झाली होती. मग जेव्हा जेव्हा, जसे जसे पैसे मिळायचे, तेव्हा मी गुंतवणूक करत गेले".

ऋतुजा म्हणाली, "आईचं नेहमीच हे म्हणणं असायचं की स्वावलंबी असलं पाहिजे. स्वत:चं घर असलं पाहिजे. आर्थिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या इतकं स्वावलंबी असावं की त्यासाठी लग्न करायची गरज नाही. लग्न करावं ते एका जोडीदारासाठी. तुम्ही समान असलं पाहिजे. ते खूप आधीपासून डोक्यात होतं. तर या सगळ्या विचारातून घर घेतलं. आता काही दिवसांपूर्वीच 'फुडचं पाऊल' नावाचं रेस्टॉरंट सुरू केलं आहे".

आता आगामी काळात ती कोणत्या नव्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.