रमेश देव-सीमा यांचं कोल्हापूरशी होतं खास नातं, राजाराम थिएटरमध्ये बांधलेली लग्नगाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 09:43 AM2023-08-25T09:43:59+5:302023-08-25T09:57:29+5:30

रमेश देव-सीमा देव जोडीच्या लग्नाची गोष्ट

मराठीतील आदर्श जोडपं कोण हे विचारलं तर आपसूकच रमेश देव-सीमा देव यांची जोडी आठवते. एकमेकांवरचं जीवापाड प्रेम ते काय हे या जोडप्याकडे बघून कळतं. प्रेमाच्या आणाभाका घेतल्यानंतर शेवटच्या श्वासापर्यंत ते जपणं महत्वाचं आहे. या जोडीने ते दाखवून दिलं म्हणून ही आदर्श जोडी आहे.

साधारण दीड वर्षांपूर्वी रमेश देव यांचं निधन झालं. तर काल सीमा देव यांनी जगाचा निरोप घेतला. आज दोघंही आपल्यात नाही म्हणल्यावर झपकन त्यांची प्रेमकहाणी आठवते.

रमेश देव यांचं एका मुलाखतीतील एक वाक्य ऐकून तर आजही भावूक व्हायला होतं. रमेश देव यांचं सीमा यांच्यावर प्रचंड प्रेम होतं. तुझ्या मांडीवर मृत्यू यावा असं ते म्हणाले होते.

सीमा देव व रमेश देव दिग्गज कलाकारांपैकी एक. त्यांनी कोल्हापुरातील राजाराम टॉकीजमध्येच लग्नगाठ बांधली होती. राजा परांजपे आणि चारूकाका सरपोतदार यांनी रमेश देव आणि सीमा देव यांचे लग्न लावण्यात पुढाकार घेतला होता.

कोल्हापूरशी त्यांचं जवळचं नातं होतं. लग्नानंतर सीमा देव काही काळ कोल्हापुरात बिंदू चौक सबजेलजवळील अंबा सदन घरात राहायच्या. चित्रीकरणाच्या निमित्ताने त्या अनेकदा कोल्हापुरात यायच्या.

जयप्रभा स्टुडिओ व व शालिनी सिनेटोमध्ये त्यांच्या चित्रपटांचे चित्रीकरण झाले होते. ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांच्याशी त्यांची घनिष्ठ मैत्री होती.

पदार्पणातील ‘आलिया भोगासी’ या चित्रपटात सीमा यांनी रमेश देव यांच्या बहिणीची भूमिका साकारली होती. त्यानंतर आलेल्या ‘पडछाया’ या चित्रपटात त्या रमेश देव यांच्या मुलीच्या भूमिकेत दिसल्या होत्या. पुढे ‘मोलकरीण’ चित्रपटात त्या रमेश देव यांच्या नायिका बनल्या. वास्तव जीवनातही त्यांची जोडी जमली.

२०१३ मध्ये १ जुलैला रमेश देव आणि सीमा देव यांच्या लग्नाचा ५० वा वाढदिवस होता. या गोड जोडीचं देव कुटुंबियांनी पुन्हा थाटामाटात लग्न केलं होतं. त्यांच्याकडे बघून प्रेम काय असतं हे समजतं. आता दोघेही पुढच्या प्रवासाला निघाले आहेत. तिथेही ते सोबतच असतील हे नक्की.