वर्षा उसगांवकरांच्या बहिणीची भूमिका साकारून चमकली! कुठे गायब झाली 'हमाल दे धमाल' मधील 'ही' अभिनेत्री?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 12:31 IST2026-03-02T11:48:10+5:302026-03-02T12:31:19+5:30
अचानक कुठे गायब झाली 'हमाल दे धमाल'मधील ही अभिनेत्री? आता काय करते माहितीये का?

महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत असलेले,अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आज जरी आपल्यात नसले तरी ते त्यांच्या कलाकृतींमध्ये प्रेक्षकांच्या मनात कायम आहेत.

लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या गाजलेल्या सिनेमांपैकीच एक म्हणजे हमाल दे धमाल हा सिनेमा. १९८९ साली प्रदर्शित झालेला हमाल दे धमाल हा एव्हरग्रीन चित्रपट आजही घराघरात पाहिला जातो. सगळ्यात लक्षवेधी बाब म्हणजे बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर यांनी या चित्रपटात कॅमिओ केला होता.

हमाल दे धमाल चित्रपट प्रदर्शित होऊन आता जवळपास ३७ वर्षे झाली आहेत. एका हमालाला सुपरस्टार कसं बनवलं जातं अशी या चित्रपटाची कथा आहे.

दरम्यान, या सिनेमात लक्ष्मीकांत बेर्डेंसह वर्षा उसगांवकर, महेश कोठारे, गिरीश घाणेकर, सुधीर जोशी, रमेश भाटकर, अशोक शिंदे यांच्यासह ते अगदी आदेश बांदेकर पर्यंत बरेचसे कलाकार छोट्या मोठ्या भूमिकेत झळकले. शिवाय हमाल दे धमाल मध्ये वर्षा उसगांवकर यांच्या बहिणीची भूमिका साकारून एक अभिनेत्री भाव खाऊन गेली होती. कोण होती ही नायिका जाणून घेऊया...

हमाल दे धमाल चित्रपटात वर्षा उसगावकर यांच्या बहिणीची भूमिका वैशाली दांडेकर यांनी साकारली होती. या चित्रपटातून वैशाली दांडेकर हे नाव चांगलंच प्रसिद्धीझोतात आलं होतं. यानंतर वैशाली यांनी अनेक हिंदी चित्रपट मालिकांमध्ये काम केलं. मात्र, त्यांची कारकिर्द पाहिजे तशी बहरली नाही.

१९८७ सालच्या ‘अंधा युद्ध’ या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर दूरदर्शनवरील ‘महानगर’ या मालिकेतून त्यांनी रिमा लागू यांच्यासोबत काम केलं. प्रहार, जखमों का हिसाब, कर्ज तेरे खून का अशा हिंदी चित्रपटातून त्यांनी सहाय्यक अभिनेत्री म्हणून भूमिका वठवल्या. पण कालांतराने त्यांनी अभिनय क्षेत्राला रामराम ठोकला.

२०१२ साली दादर येथील अॅडव्होकेट बाळासाहेब आपटे लॉ कॉलेजमध्ये त्यांनी मुख्याध्यापक पदाचा कार्यभार सांभाळला. साल २०२२ मध्ये वैशाली दांडेकर यांनी सेवानिवृत्ती स्वीकारली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आता त्या पुण्यात आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. शिवाय सोशल मीडियावरही त्या फारशा सक्रिय नाहीत.

















