"कुटुंबासाठी करिअरचा त्याग करणार नाही", सोनाली कुलकर्णी स्पष्टच बोलली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 16:04 IST2025-02-19T15:33:51+5:302025-02-19T16:04:49+5:30

सोनाली कुलकर्णी 'Oops! अब क्या' वेबसीरिजमध्ये दिसणार आहे.

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) गेल्या अनेक वर्षांपासून सिनेसृष्टीत आहे. मराठी, हिंदी सिनेमांमधून तिने अभिनयाची छाप पाडली आहे.

५० वर्षीय सोनालीने आतापर्यंत तब्बल १०० सिनेमांमध्ये काम केलं आहे. सगळ्यात तिच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. कधी गर्लफ्रेंड, कधी बायको तर कधी आईच्या भूमिकेत ती दिसली आहे.

नुकताच तिचा 'oops! अब क्या?' हा वेब शो रिलीज झाला आहे. यानिमित्ताने तिने माध्यमांना मुलाखती दिल्या. यावेळी तिने आपल्या करिअरमधील अनेक टप्प्यांचा उलगडा केला.

मूल झाल्यानंतर करिअर बदललं का? यावर सोनाली म्हणाली, "मी माझ्या आयुष्याकडे किंवा करिअरकडे वेगळ्या दृष्टीने बघते. मला एक मुलगी आहे म्हणून मला आता ठराविकच भूमिका ऑफर होतील असा मी विचार करत नाही."

"चांगली गोष्ट म्हणजे माझ्या आजूबाजूच्या लोकांनी नेहमीच मला काम करण्यासाठी प्रोत्साहन दिलं आहे. माझा नवरा मला नेहमी म्हणतो की तू काम करत असताना सर्वात जास्त आनंदी असतेस. त्यामुळे तू काम करत राहा"

"कुटुंब एकत्र राहावं म्हणून मी आयुष्यात तडजोड करेन, त्याग करेन अशी मी व्यक्ती नाही. मला त्याग करुन महान बनायचं नाही. कदाचित काही गोष्टी निसटतील, शाळेत पालकांच्या मीटिंगला मला जाता येणार नाही किंवा एखादं फंक्शन, लग्न मिस होईल. पण कशाला प्राधान्य द्यायचं हे प्रत्येकाचं ठरलेलं असतं."

"मी माझं काम एन्जॉय करते. कोणीतरी सांगतंय म्हणून काम करायला मला आवडत नाही तर हे माझं पॅशनच आहे. हेच माझं प्रोफेशन बनलं आहे. त्यामुळे करिअर की कुटुंब? यामध्ये मी कधीच गोंधळले नाही. मला माझा मोकळा वेळही असतो. माझं एक रुटीन असतं त्यात मी माझ्या कुटुंबालाही वेळ देतेच."

सोनालीने आधी प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र काही काळातच त्यांचा घटस्फोट झाला. नंतर तिने २०१० मध्ये नचिकेत पंतवैद्यसोबत लग्नबंधनात अडकली. २०११ मध्ये तिने एका मुलीला जन्म दिला.