"हे तू काय केलंस", 'हंटर' सिनेमा पाहिल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया ऐकून दु:खी झालेली सई

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 02:11 PM2024-02-01T14:11:56+5:302024-02-01T14:19:30+5:30

'हंटर' सिनेमा पाहिल्यानंतर लोक म्हणाले, "हे तू काय केलंस"; सईने सांगितला अनुभव

बोल्ड अँड ब्युटिफूल सई ताम्हणकर तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम करून सईने नाव कमावलं.

केवळ मराठीच नाही तर बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीही सईने गाजवली आहे. २०१५ साली प्रदर्शित झालेल्या 'हंटर' या बॉलिवूड सिनेमामुळे सई चर्चेत आली होती.

राधिका आपटे, गुलशन, सागर देशमुख अशी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन हर्ष कुलकर्णी यांनी केलं होतं. या सिनेमात सईने ज्योत्स्ना ही भूमिका साकारली होती.

'हंटर'मधील तिच्या बोल्ड सीन्सचीही प्रचंड चर्चा रंगली होती. 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत सईने या सिनेमाचा अनुभव सांगितला.

सई म्हणाली, "मी गुलशन आणि राधिकाची जबरदस्त फॅन आहे. त्यांच्याबरोबर काम करायचं म्हणून मी खूप उत्सुक होते. हर्ष कुलकर्णीला जेव्हा मी भेटले तेव्हा मला एक माणूस आणि दिग्दर्शक म्हणून ती व्यक्ती खूप आवडली."

"त्या भूमिकेसाठी ज्या अभिनेत्रीची निवड झाली होती. तिच्या कुटुंबात ऐनवेळी काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. त्यामुळे ती काम करू शकत नव्हती."

"हर्षने मला पहिल्यांदा बघितलं तेव्हा तो म्हणाला तू खूप छोटी दिसतेस. तेव्हा मग मी त्यांना माझे साडीतले फोटो दाखवले."

"तू साडीत वेगळी वाटते. आपण करुया हा सिनेमा, असं तो मला म्हणाला.

"'हंटर' जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा काही लोकांच्या 'हे तू काय केलंस' अशा प्रतिक्रिया होत्या. हे मला अपेक्षित नव्हतं. तू किती धाडसी आहेस, असं लोक म्हणतील असं मला वाटलं होतं."

"तू या सेटअपमध्ये पण तुझी छाप पाडून गेलीस, अशा प्रतिक्रिया असतील असं वाटलं होतं. पण, अशी एकही व्यक्ती मला भेटली नाही. या गोष्टीचं मला खूप वाईट वाटलं."

"आम्हाला तुझा गर्व वाटेल, असं काहीतरी कर, असं काही जण म्हणाले होते. जे लोक असं बोलले होते, ते अलीकडे २-४ वर्षांपूर्वी मला म्हणाले की आम्हाला तुझा गर्व आहे."

"त्याच्यामुळे मला असं वाटतं की काही प्रोजेक्ट हे वेळेच्या पुढचे असतात. 'हंटर'देखील असाच सिनेमा होता."