"महाराजांवर १००० चित्रपट आले तरी कमीच आहेत, पण...", ऐतिहासिक सिनेमांबाबत गश्मीर महाजनी स्पष्टच बोलला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2024 05:10 PM2024-01-07T17:10:53+5:302024-01-07T17:19:00+5:30

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गश्मीरने ऐतिहासिक चित्रपटांबाबत भाष्य केलं.

मराठी सिनेसृष्टीतील हँडसम हंक अशी ओळख मिळवलेला अभिनेता म्हणजे गश्मीर महाजनी. अभिनयाबरोबर गश्मीर त्याच्या फिटनेससाठीही ओळखला जातो.

गश्मीरने मराठीबरोबर हिंदी कलाविश्वही गाजवलं. त्याने अनेक सिनेमांत विविधांगी भूमिका साकारल्या.

'सरसेनापती हंबीरराव' सिनेमात त्याने साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या भूमिकेचं विशेष कौतुक झालं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गश्मीरने ऐतिहासिक चित्रपटांबाबत भाष्य केलं.

'अजब गजब' या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, "मला छत्रपती संभाजी महाराजांवर सिनेमा करायची इच्छा आहे. आता शक्य झालं नाही तर मी पुढच्या २-३ वर्षांत नक्की करेन. पण, जेव्हा सिनेमा करेन तेव्हा तो व्यवस्थित करेन.

"माझ्याकडे खूप ऐतिहासिक सिनेमे येतात. पण, असे सिनेमे खूप जबाबदारीने बनवावे लागतात. प्रेक्षक म्हणतात की ऐतिहासिक सिनेमे खूप येत आहेत."

"पण, महाराजांच्या कारकीर्दीतील इतके किस्से आहेत. अनेक सुभेदार, मावळे आणि शूरवीर त्यांच्या कारकीर्दीत घडले. त्यामुळे महाराजांच्या कारकीर्दीवर १००० चित्रपट झाले तरी ते कमीच आहेत."

"इतक्या कथा आहेत त्यामुळे कितीही चित्रपट झाले तरी हरकत नाही. पण, ते जबाबदारीने केले गेले पाहिजेत."

"एक चांगला ऐतिहासिक चित्रपट करण्यासाठी २-३ वर्ष लागतात. पण, दुर्देवाने तेवढा वेळ कोणता दिग्दर्शक-निर्माता द्यायला तयार नाही."

"माझ्याकडे आलेले प्रोजेक्टही असेच होते. मी त्यांना तेवढा वेळ द्यायला तयार असतो."

"पण, त्यांच्याकडे तेवढा वेळ नाही. लोक ६-६ महिन्यात चित्रपट काढून प्रदर्शित करत आहेत. असा ऐतिहासिक सिनेमा चांगला होत नाही."