वयाच्या ४० व्या वर्षीही अमृता खानविलकर इतकी फिट कशी? PCOD वर मात करण्यासाठी सांगितला खास उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 13:51 IST2025-09-23T13:41:35+5:302025-09-23T13:51:15+5:30

अमृता खानविलकरनं सांगितले उपवासाचे फायदे!

Amruta Khanvilkar: प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर हिनं कायमच आपल्या अभिनयाने चाहत्यांना प्रेमात पाडलंय. मराठी, हिंदी चित्रपटांमधून आणि अनेक रियालिटी शो मधून अमृताने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

वयाच्या ४० व्या वर्षी केवळ अभिनय आणि सौंदर्यच नाही तर तिचा फिटनेसदेखील वाखाणण्याजोगा आहे. नुकतंच अमृताने तिच्या युट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ शेअर केलाय. ज्यात तिनं चाहत्यांसोबत तिची दिनचर्या शेअर केली.

तसेच PCOD (Polycystic Ovary Syndrome) या समस्येवर मात करण्यासाठी तिने तिच्या जीवनशैलीत काय बदल केले, याचीही सविस्तर माहिती दिली. यासोबतच अमृताने उपवास (fasting) करण्याच्या फायद्यांबद्दलही सांगितले आहे.

अमृताला ८ ते १० वर्षांपूर्वी PCOD झाला होता. त्यानंतर अमृतानं जेवणाच्या वेळेत बदल केला आणि योगा करण्यास सुरुवात केली.

अमृताच्या आहारतज्ञांनी तिला रात्री ७ ते ७:३० पर्यंत जेवण करायला सांगितले, आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ७ नंतरच काहीतरी खायला सांगितले. यामुळे ती सुरुवातीला १२ तास काहीच खात नव्हती.

अमृता म्हणाली, "सुरुवातीला संध्याकाळी ७ ते सकाळी ७ असे १२ तास मी काहीच खात नव्हते… ती वेळ आता वाढलीये… मी आता जवळपास १६ तास तरी काहीच खात नाही. माझ्या रात्रीच्या जेवणाची वेळ आता फारच लवकर असते. मी साधारण ६ ते ६:३० वाजता जेवून मोकळी होते. त्यानंतर ब्लॅक कॉफी पिते किंवा चिया सीड्स विथ लेमन वॉटर पिते. मध्ये १६ तासांचा वेळ गेल्यावर सकाळी मी व्यवस्थित नाश्ता करते".

अमृताने तिच्या वैयक्तिक आयुष्यात या बदलांचा खूप फायदा झाल्याचे सांगितले. ती म्हणाली की, "या दिनचर्येमुळे मी शांत झाले आहे, वजन नियंत्रणात आले आहे, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पचनसंस्थेला पूर्ण आराम मिळतो. या काळात ती भरपूर पाणी पिते, ज्यामुळे शरीराला डिटॉक्स होण्यास मदत होते".

अमृतानं फास्टिंगचे विविध प्रकार असून ती १२ तास, १४ तास, १६ तास किंवा महिन्यातून एकदा पूर्ण २४ तास उपवास करते, असं सांगितलं. अमृताने तिच्या चाहत्यांनाही उपवासाची सुरुवात १२ तासांपासून करण्याचा सल्ला दिला. रात्री ७-८ पर्यंत जेवण करून १२ तासांनंतर सकाळी नाश्ता करण्याचे फायदे तिने सांगितले.

अमृताने उपवास करताना तिने काही पेयांचाही उल्लेख केला, ज्यांचे सेवन या काळात करता येते. यामध्ये पाणी, ग्रीन टी, ब्लॅक कॉफी, तूप-पाणी ( १ ग्लास पाण्यात एक चमचा तूप ), आवळा शॉट आणि लिंबूपाणी (साखरेशिवाय) यांचा समावेश आहे.

अमृताची दिनचर्या महागड्या डाएटवर आधारित नसून, नैसर्गिक आणि साध्या जीवनशैलीवर केंद्रित आहे, ज्यामुळे ती नेहमी तंदुरुस्त आणि निरोगी राहते. ही दिनचर्या इतकी साधी आणि सोपी आहे की, कुणीही ती सहज पाळू शकतो.