"मी वृंदावनातच राहते, मुंबईत मला करमत नाही...", कृष्णभक्तीत तल्लीन झाली मराठी अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 11:37 IST2025-07-21T11:08:28+5:302025-07-21T11:37:47+5:30

अभिनेत्रीवर कृष्णाची कृपादृष्टी, म्हणाली, "एकदा का त्याने दृष्टी ठेवली की..."

मराठीतील अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या हिंदीमध्ये जास्त सक्रिय आहेत. हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रात त्यांनी नाव कमावलं आहे. अशीच एक मराठी अभिनेत्री जी वृंदावनात रमली आहे.

अभिनेत्री कृष्णभक्तीत तल्लीन झाली आहे. आता तिला मुंबईत स्वत:च्या घरीही राहवत नाही अशी तिची अवस्था आहे. कोण आहे ही अभिनेत्री?

नुकतंच मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याला अभिनेत्रीने हजेरी लावली. यावेळी ती ग्लॅमरस लूकमध्ये नाही तर चक्क गोपी ड्रेसमध्ये आली होती. या लूकमुळे तिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. कोण आहे ही अभिनेत्री?

'काटा रुते कुणाला','अधुरी एक कहाणी' या मराठी मालिकांमध्ये दिसलेली ही अभिनेत्री आहे स्नेहा वाघ (Sneha Wagh). स्नेहा सध्या कुठे आहे असा अनेकांना प्रश्न पडला आहे. याचं तिने नुकतंच एका मुलाखतीत उत्तर दिलं.

'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत स्नेहा वाघ म्हणाली, "मी वृंदावनात असते. जेव्हा काम असतं तेव्हाच मी मुंबईत येते. मला आजकाल वृंदावनाशिवाय दुसरीकडे कुठेही जायला आवडत नाही. माझ्या स्वप्नातही वृंदावन असतं."

"मला सुरुवातीपासूनच एकदम साधं राहायला आवडतं. मला खूप फॅशनेबल राहायला आवडत नाही. वृंदावनमध्ये गेल्यावर गोपी ड्रेसपेक्षा जास्त कंफर्टेबल काहीच नाही हे माझ्या लक्षात आलं. छान, सुटसुटीत, साधा असा हा ड्रेस मवृंला आवडतो."

"मी आधी ३ दिवसांसाठी वृंदावनात गेले होते. त्यांनीच मला आमंत्रण दिलं होतं. वृंदावनाची महिमा ते मला दाखवणार होते. ते दिवस खूपच सुंदर होते. त्यानंतर मी वृंदावनातून बाहेर गेले पण माझ्यातून वृंदावन कधीच बाहेर आलं नाही."

"मुंबईत परतल्यावर मी इथे राहूच शकत नव्हते. मला झोप लागत नव्हती. मला मुंबईतल्या माझ्याच घरात अनकंफर्टेबल वाटायचं. मी वृंदावनातील एका मैत्रिणीला फोन करुन सांगितलं की मला मुंबईत करमत नाहीए.

"तेव्हा ती मला म्हणाली की, 'स्नेहा, कृष्णाने तुझ्यावर दृष्टी ठेवली आहे'. मुंबईकर म्हणून मला हे नवीनच होतं. नंतर जेव्हा मी त्याबद्दल वाचलं, बघितलं तेव्हा मला जाणीव झाली. कृष्ण तुमच्यावर दृष्टी ठेवतो तेव्हा तो तुम्हाला सोडत नाही. अशा प्रकारे मग तुम्ही कृष्णप्रेमीच होऊन जाता."