पाकिस्तानला दिला चकवा अन् वाचवला भारतीय युवतीचा जीव; 'या' अधिकाऱ्यासमोर शत्रूही थरथर कापतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 15:02 IST2025-03-28T14:57:02+5:302025-03-28T15:02:50+5:30

बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहमचा नवा सिनेमा 'द डिप्लोमॅट' सध्या चर्चेत आहे. हा सिनेमा भारतीय आयएफएस अधिकारी जे.पी. सिंह यांच्यावर बनला आहे. जे.पी. सिंह यांचं पूर्ण नाव जितेंद्र पाल सिंह असं आहे. भारताच्या प्रमुख अधिकाऱ्यांपैकी ते एक आहेत. सध्या ते इस्त्रायलमध्ये भारतीय राजदूत म्हणून कार्यरत आहेत.

द डिप्लोमॅट हा सिनेमा २०१७ साली पाकिस्तानात एक भारतीय महिला उज्मा अहमदसोबत घडलेल्या एका घटनेवर आधारित आहे. कशारितीने या भारतीय महिलेला सुरक्षितपणे परत आणले गेले ही कहाणी त्यात आहे. तिला सुखरूप भारतात आणण्यामागे जे.पी. सिंह यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती.

आयएफएस अधिकारी जे.पी. सिंह यांनी हे संपूर्ण प्रकरण हाताळलं होते. त्यांनी पाकिस्तानला चकवा देत भारतीय युवतीला मायदेशी आणले होते. इतकेच नाही तर जेव्हा ते अफगाणिस्तानात कार्यरत होते, तेव्हा तालिबानच्या नियंत्रणात भारताच्या राजनैतिक संबंधांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती.

द डिप्लोमॅट सिनेमा भारतीय महिला उज्मा अहमदच्या सत्य घटनेवर आधारित आहे. जिने पाकिस्तानात भयानक परिस्थितीचा सामना केला होता. त्यावेळी तिच्या मदतीसाठी आणि सुरक्षेसाठी जे.पी. सिंह यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती. जे.पी. सिंह यांनी ही जबाबदारी उत्तम सांभाळत उज्मा अहमदला सुरक्षित पाकिस्तानातून भारतात आणलं होते

जे.पी. सिंह हे २००२ च्या बॅचमधील भारतीय परदेश सेवा(IFS) अधिकारी आहेत. सिंह यांनी आधी अफगाणिस्तान, पाकिस्तान, तुर्की येथे जबाबदारी सांभाळली होती. २००८ ते २०१२ या कालावधीत ते काबुल येथे तैनात होते, जिथं अमेरिकेच्या नेतृत्वात २० वर्षापासून युद्धाची परिस्थिती होती.

अफगाणिस्तानच्या राजधानीत भारतीय दूतावास कार्यालयावर २ वेळा दहशतवादी हल्ला झाला होता. जे.पी. सिंह यांनी २०१४ ते २०१९ पर्यंत पाकिस्तानात भारतीय उपउच्चायुक्त पद सांभाळले. २०२० ते २०२५ पर्यंत ते परराष्ट्र खात्यात संयुक्त सचिव म्हणून पाकिस्तान अफगाणिस्तान-ईराण विभागाचे नेतृत्व करत होते. आतापर्यंत दीर्घकाळ संयुक्त सचिव राहणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी ते एक आहेत.

उज्मा अहमदसोबत घडलेली घटना २०१७ सालची आहे. जेव्हा जे.पी. सिंह पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे तैनात होते. उज्मा अहमदला मलेशियात ताहीर अली नावाच्या पाकिस्तानी युवकाने प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. तिची फसवणूक करून तिला पाकिस्तानात आणलं, जिथं आधीच लग्न झालेले असताना त्याने भारतीय महिलेशी बळजबरीनं लग्न केले.

लग्नानंतर उज्माला बंधक बनवण्यात आले, तिच्यासोबत मारहाण, लैंगिक शोषण होऊ लागले. कसंतरी करून उज्मा इस्लामाबादच्या भारतीय उच्चायुक्त कार्यालयात पोहचली. त्यानंतर बराच काळ कायदेशीर लढाईनंतर ती भारतात परतली. उज्माला भारतात सुरक्षित आणण्यासाठी जे.पी. सिंह यांनी खूप मोठी भूमिका निभावली. हीच कहाणी द डिप्लोमॅट सिनेमात दाखवण्यात आली आहे.

ऑगस्ट २०२१ साली तालिबाननं काबुलवर कब्जा केला तेव्हा वाढत्या सुरक्षेमुळे भारताला दूतावास कार्यालय बंद करावे लागले. तिथून कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यानंतर मोदी सरकारने जे.पी. सिंह यांना तालिबान प्रशासनासोबत संपर्क ठेऊन भारतीय हित साधण्याची जबाबदारी देण्यात आली.

त्यानंतर जे.पी. सिंह यांनी अफगाणिस्तानात अनेक सीक्रेट दौरे केले. तालिबानच्या अंतरिम सरकारच्या प्रमुखांना भेटले. सिंह यांचे दौरे तालिबानी राजवटीसोबत भारताचे संबंध पुन्हा सुरू करण्यासाठी महत्त्वाचे होते. जून २०२२ मध्ये पुन्हा अफगाणिस्तानात भारतीय दूतावास कार्यालय उघडले. सध्या जे.पी. सिंह भारताचे राजदूत म्हणून इस्त्रायलमध्ये कार्यरत आहेत.