Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 19:09 IST2025-12-24T18:59:14+5:302025-12-24T19:09:59+5:30
Sukesh Chandrashekhar And Jacqueline Fernandez : ख्रिसमसच्या निमित्ताने सुकेशने जॅकलिनला शुभेच्छा दिल्या असून, अमेरिकेतील उच्चभ्रू भाग असलेल्या बेव्हरली हिल्समध्ये एक आलिशान बंगला गिफ्ट केल्याचा दावा केला आहे.

कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात जेलमध्ये असलेल्या सुकेश चंद्रशेखरने पुन्हा एकदा बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला पत्र लिहून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

ख्रिसमसच्या निमित्ताने सुकेशने जॅकलिनला शुभेच्छा दिल्या असून, अमेरिकेतील उच्चभ्रू भाग असलेल्या बेव्हरली हिल्समध्ये एक आलिशान बंगला गिफ्ट केल्याचा दावा केला आहे. या बंगल्याला त्याने 'लव्ह नेस्ट' असं नाव दिलं आहे.

सुकेशने पत्रात लिहिलं आहे की, "Wish you a Merry Christmas Baby. हा तो सण आहे जो मला नेहमी तुझ्यासोबत घालवलेले खास क्षण, आठवणी आणि तुझ्याबद्दलच्या माझ्या वेड्या प्रेमाची आठवण करून देतो, जे नेहमीच अविस्मरणीय आहे."

हे खास गिफ्ट देताना जॅकलिन समोर नसल्यामुळे सुकेशने पत्रात खंत व्यक्त केली आहे. "मला वाईट वाटतंय की, या खास दिवशी तुला गिफ्ट देताना मी तुझी 'बनी स्माइल' पाहू शकत नाही."

"बेबी, या शानदार आणि गौरवशाली दिवशी मी तुला 'द लव्ह नेस्ट' देतो. बेवर्ली हिल्समध्ये तुझं आणि आपलं हे नवीन घर आहे. माय लव्ह, हे तेच घर आहे जे मी तुझ्यासाठी आणि आपल्यासाठी बांधलं होतं, जे पूर्ण होणार नाही असं तुला वाटलं होतं."

"बेबी, मला हे सांगताना अभिमान वाटतोय की मी तुझ्यासाठी हे घर पूर्ण केलं आहे आणि आज ख्रिसमसच्या दिवशी तुला ते गिफ्ट म्हणून देत आहे. हे आपल्या आधीच्या नियोजित घरापेक्षा मोठं आणि उत्तम आहे" असं सुकेशने म्हटलं आहे.

जॅकलिनला लिहिलेल्या पत्रात सुकेशने असाही दावा केला आहे की, या घराच्या सभोवताली स्वतःचा '१९ होल' असलेला गोल्फ कोर्स आहे. सुकेशने गमतीने या घराची तुलना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रसिद्ध 'मार-ए-लागो' रिसॉर्टशी केली.

"बेबी, संपूर्ण अमेरिकेत हे आपल्याला हवं असलेलं एकमेव घर आहे. मला खात्री आहे की, गमतीने सांगायचं तर आपलं 'लव्ह नेस्ट' पाहून आमचे भाऊ डीटी (डोनाल्ड ट्रम्प) यांच्या 'मार-ए-लागो'लाही हेवा वाटेल" असंही सुकेश म्हणाला.

सुकेश चंद्रशेखर यापूर्वीही होळी आणि आपल्या वाढदिवसासारख्या विविध प्रसंगी जॅकलिनला जेलमधून पत्रं लिहीत आला आहे. मात्र, जॅकलिन फर्नांडिसने या पत्रांवर आक्षेप घेतला होता.

अभिनेत्रीने दिल्ली न्यायालयात याचिका दाखल करून, सुकेशकडून वारंवार येणारी पत्रं आणि होणारा मानसिक त्रास थांबवण्याची मागणी केली होती. या दोघांची चर्चा रंगली होती.

सुकेशच्या गुन्हेगारी कारवायांची माहिती असूनही जॅकलिनने त्याच्याकडून दागिने, कपडे, गाड्या आणि इतर वस्तूंच्या स्वरूपात ७ कोटी रुपयांच्या महागड्या भेटवस्तू स्वीकारल्याचा आरोप ईडीने केला आहे. मात्र, जॅकलिनने हे आरोप फेटाळून लावले असून सुकेशच्या गुन्हेगारी इतिहासाबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचं म्हटलं आहे.

















