एकच चित्रपट, शाहरुखबरोबर रोमान्स, लग्नानंतर बॉलिवूड सोडलं अन्...; आता कार अपघातामुळे चर्चेत आली 'स्वदेस' फेम गायत्री जोशी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 11:46 AM2023-10-04T11:46:49+5:302023-10-04T11:58:52+5:30

कार अपघातामुळे चर्चेत आलेली'स्वदेस' फेम गायत्री जोशी आहे तरी कोण? एकच चित्रपट केला आणि बॉलिवूडला ठोकला रामराम

'स्वदेस' फेम बॉलिवूड अभिनेत्री गायत्री जोशीचा इटलीत मोठा अपघात झाला आहे. गायत्री आणि तिचा पतीच्या कारची दुसऱ्या कारला धडक लागून अपघाच झाला. या अपघातात फरारी कारमधील जोडप्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात गायत्री आणि तिचा पती यांचे प्राण वाचले आहेत.

कार अपघातामुळे गायत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गायत्रीने २००४ साली 'स्वदेस' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात तिने शाहरुख खानबरोबर स्क्रीन शेअर केली होती. पहिल्याच चित्रपटाने गायत्रीला लोकप्रियता मिळवून दिली.

बॉलिवूडमध्ये येण्याआधी गायत्री मॉडेलिंग करत होती. तिने २०००साली एका आंतरराष्ट्रीय सौंदर्यस्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. फेमिना मिस इंडिया या स्पर्धेत ती टॉप पाच स्पर्धकांपैकी एक होती.

गायत्री अनेक जाहिरातींतही झळकली. 'कागज की कश्ती', 'हंस राज हंस' यांसारख्या म्युझिक व्हिडिओमध्येही गायत्रीने काम केलं आहे.

२००५ साली गायत्रीने मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक असलेल्या विकास ओबेरॉयबरोबर गायत्रीने लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. लग्नानंतर गायत्रीने बॉलिवूडला कायमचा रामराम केला.

एका मुलाखतीत गायत्रीने सिनेसृष्टी सोडण्यामागचं कारण सांगितलं होतं. "स्वदेस सिनेमानंतर मला अनेक संधी मिळतील असे वाटले होते. पण अनेकदा आपण विचार करतो तसं होतंच असं नाही. मला वाटलं होतं की मी लग्नानंतरही फिल्म्समध्ये काम करेन, पण नंतर कुटुंबासाठी मी इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला," असं ती म्हणाली होती.

गायत्रीचे पती विकास ओबेरॉय मोठे उद्योजक असून त्यांची रिअल इस्टेट टायकून अशी ओळख आहे. त्यांची मुंबईत रिअर इस्टेट फर्म आहे. गायत्री सुद्धा त्यांचा बिझनेस सांभाळते.