'हा' मराठमोळा स्टार टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत महागडा! दिलीप जोशी, रुपाली गांगुलीही मागे पडले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 17:17 IST2025-05-18T17:01:33+5:302025-05-18T17:17:01+5:30
रूपाली, दिलीप जोशी यांना मागे टाकत 'हा' मराठमोळा ठरला छोट्या पडद्यावरचा सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता!

छोट्या पडद्यावर अनेक दिग्गज कलाकारांनी आपली छाप सोडलेली असताना आता एक मराठमोळा चेहरा चर्चेत आला आहे.
'अनुपमा'मधील अनुपमा उर्फ रूपाली गांगुली आणि 'तारक मेहता का उलटा चष्मा'मधील जेठालाल उर्फ दिलीप जोशी यांना मागे टाकत मराठमोळ्या अभिनेता टीव्ही इंडस्ट्रीमधील सर्वात महागडा अभिनेता ठरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा मराठी अभिनेता सध्या एका टीव्ही शोसाठी प्रत्येक एपिसोडसाठी तब्बल ३ लाख रुपये मानधन घेत आहे. विशेष म्हणजे या अभिनेत्यानं तब्बल ८ वर्षांनी छोट्या पडद्यावर कमबॅक केलं आहे.
जवळपास 8 वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करणारा हा अभिनेता आहे शरद केळकर (Sharad Kelkar). तो नवीन शो 'तुम से तुम तक' या मालिकेतडून टीव्हीवर परतला आहे.
डीएनएच्या अहवालानुसार, शरदला या नवीन मालिकेसाटी प्रतिदिन ३.५० लाख मिळत आहेत. जर या शोचं महिन्यातून ३० दिवस शूट केलं गेलं तर शरद महिन्याला १ कोटी रुपयांपेक्षा (Sharad Kelkar Highest Paid Actor On Television) जास्त कमाई करेल.
या मालिकेत १९ वर्षीय मुलगी अनु आणि ४६ वर्षीय उद्योगपती आर्यवर्धन (शरद केळकर) यांची कहाणी आहे. यामध्ये शरद केळकरसोबत निहारिका चौकसी ही अनुची भूमिका साकारत आहे. या मालिकेत, दोन्ही पात्रे एकमेकांच्या प्रेमात पडतात. प्रेक्षक हा शो झी टीव्ही चॅनल आणि ओटीटी प्लॅटफॉर्म ZEE5 वर पाहू शकतात.
शरद आणि निहारिकाची 'तुम से तुम तक' ही मालिका मराठीतील सुबोध भावे आणि गायत्री दातारची गाजलेली मालिका 'तुला पाहते रे' चा रिमेक असणार आहे.
'कुछ तो लोग कहेंगे', 'साथ फेरे - सलोनी का सफर', 'सिंदूर तेरे नाम का' आणि 'सीआयडी' सारख्या शोमध्ये दिसला आहे. टीव्हीसोबतच शरदने 'गोलियों की रासलीला राम-लीला', '1920-इव्हिल रिटर्न्स' आणि 'तानाजी' यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे.
अभिनयाव्यतिरिक्त, शरद केळकरच्या आवाजाचा एक मोठा चाहतावर्ग आहे. शरद केळकर प्रभासच्या 'बाहुबली' आणि 'बाहुबली २' या हिंदी चित्रपटांमध्ये अभिनेत्याच्या भूमिकेला आवाज दिला होता. यासोबतचं त्यानं 'डॉन ऑफ द प्लॅनेट ऑफ द एप्स', 'गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी', 'फ्युरियस ७', 'मॅड मॅक्स: फ्युरी रोड', 'xXx: रिटर्न ऑफ झेंडर केज' यांसारखे अनेक हॉलिवूड चित्रपट देखील डब केले आहेत.
गेल्या कित्येक वर्षांपासून शरद केळकर आपल्या दमदार अभिनयामुळे आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो आहे. सोशल मीडियावरही त्याची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. आता टीव्ही इंडस्ट्रीतील 'हायेस्ट पेड स्टार' बनल्याने त्याचं कौतुक सर्वत्र होत आहे.