'दिल तो पागल है'मध्ये करिश्माचा बॅकग्राऊंड डान्सर होता 'हा' अभिनेता; आज आहे कोट्यवधींचा मालक, ओळखलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 19:06 IST2026-02-27T18:56:09+5:302026-02-27T19:06:36+5:30
एकेकाळी बॅकग्राऊंड डान्सर ते बॉलिवूडचा आघाडीचा नायक, असं बदललं त्याचं नशीब

चित्रपटसृष्टीत नशीब आजमावायला येणाऱ्या प्रत्येकालाच इथे संधी मिळते असे नाही, काहींना मिळते तर काहींना ती उशीरा मिळते तर काही निराश होवून घरचा रस्ता पकडतात. मात्र काही कलावंत या सर्व पातळ्यांवर यशस्वी होत बहुप्रतीक्षेनंतर नाव कमावतात, त्यापैकीच एक म्हणजे शाहिद कपूर.

शाहिद कपूर हा बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेता आणि दिग्दर्शक पंकज कपूर आणि अभिनेत्री व शास्त्रीय नर्तिका नीलिमा अझीम यांचा मुलगा आहे. आई-वडील कला क्षेत्रात असल्यामुळे अभिनयाचं बाळकडू त्याला लहानपणीच मिळालं. तो फक्त तीन वर्षांचा असताना त्याच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला.

शाहिदचे प्रारंभिक शिक्षण दिल्लीतील ज्ञान भारती शाळेत झाले, त्यानंतर मुंबईला आल्यानंतर राजहंस विद्यालयात शिक्षण घेतले. शाहिदने बाल मॉडेल म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि आयशा टाकियासोबत कॉम्प्लेन हेल्थ ड्रिंक या प्रसिद्ध जाहिरातीमध्ये काम केलं. स्टार किड असूनही त्याला प्रचंड संघर्ष करावा लागला.

नव्वदच्या दशकात शाहिदने दिल तो पागल है आणि ताल या चित्रपटातील गाण्यांमध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केलं. त्यानंतर तो म्युझिक व्हिडीओ तसंच काही जाहिरातींमध्येही झळकला.

शाहिद कपूरने २००३ मध्ये केन घोष दिग्दर्शित 'इश्क विश्क "या रोमँटिक चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पाऊल ठेवलं. किशोरवयीन विद्यार्थ्याच्या भूमिकेने त्याला सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पणासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. नंतर त्याने 'फिदा' , 'दिल मांगे मोर', 'दीवाने हुए पागल' , 'वाह! लाइफ हो तो ऐसी! ,शिखर, ३६ चायना टाऊन, चुप चुप के फूल या चित्रपटातील त्याच्या अभिनय कौशल्याची प्रशंसा होऊनही, त्यानंतरच्या वर्षांमध्ये त्याला अपयशांला सामोरं जावं लागलं.

२००६ मध्ये सूरज बडजात्या यांच्या 'विवाह' या चित्रपटामधून शाहिदला यश मिळाले, यात त्याने अभिनेत्री अमृता रावसोबत अभिनय साकारला होता. हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरला आणि शाहिदीला लोकप्रियता मिळाली.

आपल्या संपूर्ण कारकिर्दीत शाहिद कपूरने अनेक उल्लेखनीय दिग्दर्शक आणि अभिनेत्यांसोबत काम केले आहे. विशाल भारद्वाज, इम्तियाज अली आणि सूरज बडजात्या यांच्यासारख्या दिग्दर्शकांसोबतच्या त्याने अभिनयाचे अविस्मरणीय सादरीकरण केले. शाहिदने करीना कपूर, प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोण या आघाडीच्या अभिनेत्रींसोबतही रुपेरी पडदा शेअर केला. एकेकाळी बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम करणारा हा अभिनेता कोट्यवधींचा मालक आहे.

वैयक्तिक आयुष्यात शाहिद कपूरने ७ जुलै २०१५ ला गुडगावच्या द ओबेरॉय हॉटेलमध्ये झालेल्या एका खासगी समारंभात मीरा राजपूतशी लग्न केले. या जोडप्याला २०१६ मध्ये जन्मलेली मिशा कपूर नावाची मुलगी आणि २०१८ मध्ये जन्मलेला झैन कपूर ही दोन अपत्ये आहेत. सध्या अभिनेता ओ रोमियो सिनेमामुळे चर्चेत आहे.

















