शाहिद कपूर व मीरा राजपूतचा नव्या घरात गृहप्रवेश, इतक्या कोटींना खरेदी केलं ड्युप्लेक्स अपार्टमेंट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 06:03 PM2022-09-29T18:03:37+5:302022-09-29T18:09:27+5:30

Shahid Kapoor : शाहिद कपूर व मीरा राजपूत हे बॉलिवूडचं लोकप्रिय कपल. शाहिद व मीरा किती लक्झरी आयुष्य जगतात, हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. आता तर हे जोडपं नव्या अलिशान घरात राहायला गेलं आहे...

शाहिद कपूर व मीरा राजपूत हे बॉलिवूडचं लोकप्रिय कपल. शाहिद व मीरा किती लक्झरी आयुष्य जगतात, हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. आता तर हे जोडपं नव्या अलिशान घरात राहायला गेलं आहे.

होय, नवरात्रीचा शुभ मुहूर्त साधत शाहिद व मीरा यांनी नव्या घरात गृहप्रवेश केला. छोटीशी गृहप्रवेशाची पूजा यावेळी पार पडली. आता शाहिद व मीराच्या या नव्या घराबद्दल जाणून घेण्यास तुम्ही उत्सुक असाल.

तर शाहिइ व मीराचं नवं घर मुंबईतील वरळी परिसरात आहे. चार वर्षांपूर्वी शाहिदने हे घर खरेदी केलं होतं. गेल्या अनेक महिन्यांपासून या घराच्या इंटिरिअरचं काम सुरु होतं.

मीराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या घराचे काही फोटोही शेअर केले होते. या घराची किंमत 58 कोटी असल्याचं म्हटलं जात आहे. मुंबईच्या वांद्रे वरळी सी-लिंक भागात हे घर आहे.

2018मध्ये शाहिद-मीराने वरळी परिसरात हे घर खरेदी केलं होतं. वांद्रे-वरळी सी लिंकजवळ 360 वेस्टमध्ये एका बहुमजली इमारतीच्या 42 व्या 43 व्या फ्लोअरवर हे ड्युप्लेक्स अपार्टमेंट आहे.

मीशा व झैनच्या जन्मानंतर राहतं घर छोटं वाटू लागलं. त्यामुळे मीरा व शाहिदने नवं घर खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता आणि काहीच दिवसांत त्यांना त्यांच्या स्वप्नांतलं घर मिळालं होतं.

मात्र करोना काळामध्ये कपूर कुटुंबीय आपल्या नव्या घरामध्ये राहण्यासाठी जाऊ शकलं नाही. पण आता नवरात्रीनिमित्त शाहिदने नव्या घरामध्ये गृह प्रवेश केला आहे.

‘पिंकविला’ला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहिद व मीरा आपल्या मुलांसह पाच दिवसांपूर्वीच नव्या घरामध्ये राहण्यासाठी गेले आहेत. मीरा व शाहिद दोघांनी मिळून आपल्या घराचं इंटेरियर उत्तम पद्धतीने केलं आहे.