निर्घृण खून, आत्महत्या अन् अपघाती निधन; ऑक्टोबर महिन्यात सिनेसृष्टीवर काळाचा घाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 14:47 IST2025-10-29T14:42:23+5:302025-10-29T14:47:36+5:30
सिनेसृष्टीसाठी ऑक्टोबर महिना हा खूप कठीण होता. एका महिन्यात सिनेसृष्टीने ८ कलाकार गमावले. ज्यामुळे सिनेसृष्टीचं मोठं नुकसान झालं आहे.

सिनेसृष्टीसाठी ऑक्टोबर महिना हा खूप कठीण होता. एका महिन्यात सिनेसृष्टीने ८ कलाकार गमावले. ज्यामुळे सिनेसृष्टीचं मोठं नुकसान झालं आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच सिनेसृष्टीला हादरवणारी बातमी समोर आली. ७ ऑक्टोबरला झुंड फेम अभिनेता बाबू छत्री म्हणजेच प्रियांशू क्षत्रिय याची निर्घृण हत्या करण्यात आली. त्याचा मृतदेह पोलिसांना अर्धनग्न अवस्थेत आढळला होता. वादातून मित्रानेच त्याची हत्या केल्याचं समोर आलं होतं.

त्यानंतर ८ ऑक्टोबरला ३५ वर्षीय पंजाबी गायक राजवीर जवांदा याचं अपघाती निधन झालं. राजवीर हिमाचल प्रदेशात रोडट्रिपला गेला होता. तिथे अपघातात त्याचा दुर्देवी मृत्यू झाला.

राजवीर जवांदाच्या निधनानंतर दुसऱ्याच दिवशी बॉडीबिल्डर वरिंदर सिंग याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. विशेष म्हणजे राजवीरच्या मृत्यूनंतर त्याने पोस्ट शेअर करत मित्राला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली होती.

१५ ऑक्टोबर रोजी सिनेसृष्टीने दिग्गज अभिनेता गमावला. महाभारतातील कर्ण अशी ओळख मिळवलेले पंकज धीर यांचं कर्करोगाने निधन झालं. ते ६८ वर्षांचे होते.

ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांचं २० ऑक्टोबर रोजी निधन झालं. ८४व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यानंतर दोनच दिवसांनी बॉलिवूड अभिनेता ऋषभ टंडनचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. तो ३५ वर्षांचा होता.

२५ वर्षीय मराठी अभिनेता सचिन चांदवेडेच्या आत्महत्येने सिनेसृष्टी हळहळली. २४ ऑक्टोबरला सचिनने गळफास घेत आत्महत्या केली. सचिनने आगामी सिनेमाच्या रिलीजच्या तोंडावरच हे धक्कादायक पाऊल उचललं. त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

साराभाई वर्सेस साराभाई फेम ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांनी २५ ऑक्टोबरला अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या आकस्मिक निधनाने कलाकारांना मोठा धक्का बसला.

















