Salman Khan: शेराची सुरक्षा, बंदुकधारी गार्ड अन् बुलेटप्रूफ कार; मग सलमानला शस्त्र परवान्याची काय गरज..?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 15:18 IST2022-08-01T15:14:20+5:302022-08-01T15:18:27+5:30
Salman Khan: बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला आज बंदुकीचा परवाना मिळाला आहे. जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर सलमानने परवान्यासाठी अर्ज केला होता.

Salman Khan Get Gun Licence: बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतात. सुरक्षेसाठी अनेकजण नेहमी सोबत बॉडीगार्ड घेऊन फिरतात. याशिवाय अनेक सेलिब्रिटी सुरक्षेसाठी बंदूक सोबत ठेवतात. पण बंदुकीचा परवाना मिळणे वाटते तितके सोपे नाही. अनेक सेलिब्रिटींना बंदुकीचे परवाने मिळवण्यासाठी खूप धडपड करावी लागते. आता या यादीत अभिनेता सलमान खानही सामील झाला आहे.
सलमान खान त्याच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्याला लॉरेन्स विश्नोई गँगकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. त्यानंतर सलमानची सुरक्षाही वाढवण्यात आली. याशिवाय, त्याचा खासगी बॉडीगार्ड शेरा, आर्म सिक्युरिटी आणि बुलेटप्रूफ कार असतानाही सलमानने बंदुकीचा परवाना घेण्याचा निर्णय घेतला.
भाईजानने नुकताच बंदुकीच्या परवान्यासाठी अर्ज केला होता आणि आता त्याला हा परवाना मिळाला आहे. पण हा परवाना मिळणे तितके सोपे नाही. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. सिद्धू मुसेवालाच्या निधनानंतर इंडस्ट्रीत भीतीचे वातावरण पसरले होते. सिद्धू मूसवाला प्रकरणानंतर सलमानचे वडील सलीम खान यांना मॉर्निंग वॉक दरम्यान एक पत्र मिळाले.
सलीम खान यांना मिळालेल्या पत्रात सलमान आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या पत्रात 'तुमची अवस्था मूसेवालासारखी होईल', असे म्हटले होते. सलमानला जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने दिले होते. या धमकीनंतर सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली आणि त्याला न सांगता सार्वजनिक ठिकाणी जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
लॉरेन्स बिश्नोई टोळीने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्याची ही पहिलीच वेळ नाही. सलमान खानवर काळवीट शिकार केल्याचा आरोप होता. 'हम साथ साथ है' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हा प्रकार घडला होता. काळवीटाला मारल्याप्रकरणी लॉरेन्स बिश्नोईने सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीचा व्हिडिओ व्हायरल होऊ लागला होता.
बिश्नोईचा हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. व्हायरल होत असलेला लॉरेन्स बिश्नोईचा हा व्हिडिओ सलमान खानसाठी फायदेशीर ठरला. कारण आता त्यामुळेच सलमानला बंदुकीचा परवाना मिळाला आहे. 22 जुलै रोजीच सलमान खानने बंदूक परवान्यासाठी अर्ज केला होता. यासाठी त्याने पोलिस आयुक्तांची भेट घेतली होती. अर्ज केल्यानंतर 10 दिवसांत सलमानला हा परवाना मिळाला आहे.
दरम्यान, भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीलाही परवाना मिळणे खूप कठीण झाले होते. 2008 मध्ये धोनीने परवान्यासाठी अर्ज केला होता. पहिल्यांदा त्याचा अर्ज नाकारण्यात आला, पण नंतर त्याला 2010 मध्ये परवाना मिळाला. धोनीने शस्त्र परवान्यासाठी अर्ज का केला, त्याला कुणाचा धोका आहे, याबाबत काही ठोस माहिती मिळू शकली नाही.
आर्म्स अॅक्ट, 1959 अन्वये व्यक्ती स्वसंरक्षणासाठी परवाना घेऊन शस्त्र सोबत बाळगू शकतात. बंदुकीचा परवाना मिळविण्यासाठी, तुमच्या जीवाला धोका आहे, हे सिद्ध करावे लागेल. सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र येणे फायदेशीर ठरले आहे. पहिले पत्र आणि नंतर 8 वर्षे जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामुळे सलमानचे लायसन्स मिळवण्याचे काम अगदी सोपे केले. त्यामुळे अवघ्या 10 दिवसांत त्याला परवाना मिळाला.