'रामायण'साठी रणबीर कपूरचं मानधन वाचून बसेल धक्का, सर्वात कमी साई पल्लवीला?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2024 11:38 AM2024-04-07T11:38:27+5:302024-04-07T12:15:21+5:30

'रामायण'चं एकूण बजेट 600 कोटींपेक्षाही अधिक आहे.

नितेश तिवारींचा ड्रीम प्रोजेक्ट 'रामायण'(Ramayan) सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. शूटिंग सेटवरुन काही फोटोही मध्यंतरी लीक झाले. रणबीर कपूर प्रभू श्रीराम तर साई पल्लवी सीतामातेच्या भूमिकेत आहे. अरुण गोविल राजा दशरथाची भूमिका साकारत आहेत.

'रामायण' हा बिग बजेट चित्रपट असणार आहे. सुमारे 500-600 कोटी सिनेमाचं बजेट आहे. साधा सेटच 11 कोटींचा आहे. तीन भागात सिनेमा बनणार आहे. प्रभू श्रीरामाच्या आयुष्यातील वेगवेगळे टप्पे यामध्ये दाखवण्यात येतील.

या बिग बजेट सिनेमासाठी कलाकारांचं मानधनही तेवढंच तगडं आहे. रणबीर कपूरने तर नुकताच Animal सारखा सुपरहिट सिनेमा दिला. त्यामुळे त्याचा भाव वधारला आहे. सिनेमासाठी रणबीर, साई पल्लवी, रवी दुबे, सनी देओल, यश या सर्व कलाकारांनी किती मानधन घेतलं जाणून घेऊया.

'कोईमोई' रिपोर्टनुसार दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) तिच्या आतापर्यंतच्या सिनेमांपेक्षा तीनपट जास्त मानधन घेणार आहे. कारण हा तिचा बॉलिवूड डेब्यूही असणार आहे. या ट्रायोलॉजी फिल्मसाठी तिला प्रत्येक भागाचे 6 कोटी म्हणजेच एकूण 18-20 कोटी मिळणार आहेत. सध्या ती साऊथ सिनेमांमध्ये अडीच ते तीन कोटी मानधन घेते.

रणबीर कपूरचं (Ranbir Kapoor) 'रामायण'मधील मानधन वाचून तुमचे डोळेच पांढरे होतील. अनेक माध्यमांच्या रिपोर्टनुसार, रणबीर कपूर एका भागासाठी तब्बल 75 कोटी फीस घेणार आहे. याचा अर्थ तीन भागांसाठी तो एकूण 225 कोटी रुपये आकारणार आहे.

'रामायण'मध्ये साऊथ सुपरस्टार यश (Yash) रावणाच्या भूमिकेत आहे. त्याचाही रल तितकाच महत्वाचा आहे. यश एका भागाचे तब्बल 50 कोटी मानधन घेणार आहे. म्हणजेच तीन भागांची एकूण 150 कोटी फीस तो आकारणार आहे.

अभिनेता सनी देओलनेही (Sunny Deol) नुकताच 'गदर 2' सुपरहिट सिनेमा दिला आहे. यानंतर त्यानेही मानधनात वाढ केली आहे. सनी देओल 'रामायण'मध्ये हनुमानाची भूमिका साकारतोय. 'बॉलिवूड हंगामा'च्या रिपोर्टनुसार, तो एका भागासाठी 45 कोटी रुपये घेईल असा अंदाज आहे.

अर्थात विविध वेब पोर्टल्सने दिलेल्या या मानधनाच्या केवळ चर्चा आहेत. सर्व कलाकार याच रेंजमध्ये फीस आकारत आहेत. मात्र याविषयी अधिकृत माहिती समोर आलेली नाही.