बादशाह ओ बादशाह! ४ वर्षांनी आला पण 'किंग'च ठरला, पठाणचा बॉक्सऑफिसवर धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 10:19 AM2023-01-31T10:19:54+5:302023-01-31T10:30:25+5:30

बॉलिवुडला वाचवायला अखेर किंग आलाच. पठाणचा जगभरात डंका! सहा दिवसात ६०० कोटींची कमाई केली.

बॉलिवुड चा वाईट काळ सुरु असतानात, बॉलिवुड इंडस्ट्री संपत आहे असं म्हणता म्हणता किंग खान वाचवायला आला. तो ४ वर्षांनी रुपेरी पडद्यावर आला मात्र सगळी कसरच भरुन काढायची असा विश्वासच घेऊन आला.

पठाण सिनेमाचा बॉक्सऑफिसवर जो काय धुमाकूळ सुरु आहे तो पाहता बॉलिवुडचा किंग एकच तो म्हणजे शाहरुख खान.

शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या पठाणने पहिल्याच दिवशी ५५ कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी प्रजासत्ताक दिनी ६८ कोटींची कमाई केली. केवळ दोनच दिवसात पठाण १०० कोटी क्लब मध्ये गेला.

२५ जानेवारी रोजी पठाण सर्वत्र रिलीज झाला. फक्त ६ दिवसात सिनेमाने भारतात ३०० कोटींचा गल्ला जमवला आहे. सहाव्या दिवशी सोमवार असूनही पठाणने २५ कोटींची कमाई केली. तर रविवारी तब्बल ६० कोटींचा बिझिनेस केला.

जगभरात तर पठाणचाच डंका आहे. सहा दिवसात ६०० कोटींची वर्ल्डवाईड कमाई सिनेमाने केली आहे. शाहरुखचा फुल अॅक्शनपॅड चित्रपट बघण्यासाठी जगभरात गर्दी जमली आहे.

पठाणचे हे जबरदस्त यश बघता काल शाहरुख, दीपिका, जॉन आणि दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी एकत्रित प्रेस कॉन्फरन्स घेतली. यावेळी शाहरुख सिनेमाविषयी आणि रिलीज आधीच्या वादाविषयी भरभरुन बोलला

पठाण सिनेमा रिलीज आधीच त्यातील बेशरम रंग गाण्याने मोठा वाद झाला. बॉयकॉट पठाण म्हणत सगळे एकवटले. मात्र त्याचा कोणताच परिणाम सिनेमावर झालेला दिसत नाही.

इतकेच नाही तर पठाणमध्ये झालेली टायगरची एंट्री पाहून चाहत्यांना डबल ट्रीटच मिळाली. सलमान शाहरुखची मोठ्या पडद्यावरची धमाल बघून चाहते भलतेच खूश झालेत. सलमानच्या कॅमिओचाही सिनेमाला नक्कीच फायदा झाला आहे.

आता पुढील काही दिवसात पठाण आणखी किती विक्रम करतो हे बघणे महत्वाचे आहे. शाहरुखला ४ वर्षांनी पडद्यावर अॅक्शन भूमिकेत पाहून चाहत्यांचा आनंद खरोखरच गगनात मावेनासा झालाय.