IN PICS : रफी व लता यांच्यातील या वादाची खूप झाली होती चर्चा, सोबत गाण्यास दिला होता नकार!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2020 12:32 PM2020-12-24T12:32:44+5:302020-12-24T12:48:22+5:30

सूरसम्राट मोहम्मद रफी यांचा आज वाढदिवस

शास्त्रीय संगीत, गझल, कव्वाली, ठुमरी, भजन, पार्श्वगायन अशा अनेक संगीत शैलीत स्वैर मुशाफिरी करणारा अवलिया मोहम्मद रफी आज आपल्यात नाहीत. पण त्यांची यादगार गाणी मात्र कायम आपल्यासोबत असतील. संगीतप्रेमींच्या मनात मोहम्मद रफी हे नाव कायम जिवंत असेल. आज (24 डिसेंबर) मोहम्मद रफी यांचा वाढदिवस.

‘तुम मुझे यूं भुला ना पाओगे...’ हे रफी यांनी स्वत: गायलेले गीत त्यांच्या आयुष्याला अगदी चपखल लागू पडते. या अवलियाच्या गाण्यांबद्दल सगळ्यांना ठाऊक आहे. पण त्यांच्या आयुष्याबद्दल फार कमी लोकांना ठाऊक आहे.

रफी आणि लता यांची जोडी आजही आयकॉनिक जोडी मानली जाते. या जोडीने एकत्र गायलेली अनेक गाणी अजरामर झालीत. मात्र या जोडीत एकेकाळी रफी व लता यांच्यातील कलह चर्चेचा विषय ठरला होता.

रफी व लता यांच्यातील वाद इतका टोकाला पोहोचला होता की, त्यांनी एकमेकांबरोबर काम करण्यास नकार दिला होता. या वादाचे कारण काय होते तर गाण्यांना मिळणारी रॉयल्टी.

होय, मोहम्मद रफी यांच्या बायोग्राफीत या वादाचा उल्लेख आहे. तर साल होते 1960. या वर्षाच्या सुरुवातीला लता व रफी यांच्यात वाद झाला होता. पुढे 3 वर्षे दोघांनी एकमेकांसोबत काम केले नव्हते.

लता मंगेशकर यांनी निर्मात्यांकडून गाण्यांना मिळणा-या रॉयल्टीमधून काही वाटा गायकांना मिळावा आशी मागणी केली होती. लता दीदींना आशा होती की, मोहम्मद रफी त्यांची साथ देतील. पण रफी यांनी लता दीदींना साथ देण्यास नकार दिला आणि लता दीदी नाराज झाल्यात.

गायक म्हणून आपल्याला फी दिली जाते हे पुरेसे आहे. नंतर गायकांनी रॉयल्टीचा वाटा मागू नये,असे रफी यांचे मत होते. लता यांना रफी यांची भूमिका पटली नव्हतीच. याच कारणामुळे दोघांमध्ये मतभेद झालेत. नंतर रफी आणि लता यांच्यात दरी निर्माण होऊ लागली.

एका मुलाखतीत स्वत: लता दीदींनी हा वादाबद्दल सांगितले होते. ‘ मी आजपासून लता मंगेशकरांबरोबर गाणार नाही, असे रफी साहब म्हणाले. पण मी त्यांना मध्येच टोकत, एक मिनिट रफी साहेब. तुम्ही माझ्याबरोबर गाणार नाही, हे चुकीचे आहे. मी तुमच्याबरोबर गाणार नाही, असे मी त्यांना म्हणाले होते.

लता व रफी यांच्यातील वाद, मतभेद, भांडण तीन वर्षांपर्यंत कायम होते. अखेर संगीतकार जयकिशन यांनी मध्यस्थी करून दोघांमध्ये समेट घडवून आणला होता.

मोहम्मद रफींकडून लेखी दिलगिरी मिळाल्यानंतर लतादीदींनी पुन्हा एकत्र काम करण्याचे मान्य केले, असे म्हटले जाते. मात्र, रफी यांच्या मुलाने याला नकार दिला होता. लतादीदीनी स्वत: जयकिशन यांना सलोखा जुळवून करण्यासाठी सांगितले होते. त्यानंतर रफी एकत्र काम करण्यास तयार झाले होते, असे त्यांच्या मुलाने स्पष्ट केले होते.