बॉलिवूडचं नाही तर महाराष्ट्राचं साऊथ कनेक्शन..! महेश बाबू आणि नम्रता शिरोडकरने या अटींवर बांधली होती लग्नगाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 12:36 PM2023-08-09T12:36:09+5:302023-08-09T12:56:02+5:30

महेश बाबू साऊथचा अन् नम्रता मराठी. मग ही प्रेमकहाणी कशी सुरू झाली? कशी फुलली? हा प्रश्न नेहमीच चाहत्यांना पडतो.

साऊथच्या सिमनेमातील स्टार महेशबाबू याचा आज ४८वा वाढदिवस. महेशबाबूचा जन्म 9 ऑगस्ट 1975 रोजी तामिळनाडूमधील चेन्नई येथे झाला. साऊथचे सुपरस्टार कृष्णा यांचा महेश बाबू हा मुलगा. चाहते महेशबाबूला प्रिन्स स्टार म्हणून ओळखतात.

साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील चित्रपटांसाठी सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे महेश बाबू. त्याच्या पडद्यावरील लव्ह स्टोरीप्रमाणे त्याची खऱ्या आयुष्यातील लव्ह स्टोरी देखील हटके आहे. महेश बाबूच्या वाढदिवसानिमित्ताने जाणून घेऊयात त्याच्या हटके लव्ह स्टोरीबाबत...

साऊथचा सुपरस्टार महेश बाबू आणि मराठमोळी अभिनेत्री नम्रता शिरोडकर यांच्या लग्नाला 18वर्षे पूर्ण झाली. 2005 साली लग्नबंधनात अडकलेल्या या दोघांची प्रेम कहाणी कोणत्याही परी कथेपेक्षा कमी नाही.

महेश बाबू साऊथचा अन् नम्रता मराठी. मग ही प्रेमकहाणी कशी सुरू झाली? कशी फुलली? हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर ही लव्हस्टोरी सुरू झाली होती एका चित्रपटाच्या सेटवर.

महेश बाबू पहिल्याच भेटीत बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात पडला होता. त्यांची पहिली भेट 1999 मध्ये 'वामसी' चित्रपटाच्या सेटवर झाली होती. जेव्हा त्याने अभिनेत्रीला पहिल्यांदा पाहिले तेव्हा तो तिच्या प्रेमात पडला. तोपर्यंत त्यांच्या प्रेमाबद्दल फक्त जवळच्या मित्रांनाच माहिती होती. चित्रपटाच्या सेटवर राहणार्‍या लोकांनाही दोघांमध्ये काय चालले आहे याची कुणालाच कोनोकान खबर नव्हती.

‘वामसी’ या चित्रपटात महेशबाबू हा नम्रताचा हिरो होता. त्याआधी महेशबाबूचं नावंही तिने ऐकलं नव्हतं. महेश बाबू व नम्रता ‘वामसी’च्या मुहूर्ताला पहिल्यांदा भेटले आणि या पहिल्याच भेटीत महेशबाबू नम्रतावर लट्टू झाला. चित्रपटाचं शूटींग सुरू झालं आणि महेशबाबू नम्रताच्या प्रेमात जणू वेडा झाला. चित्रीकरणानंतर बराच वेळ ते दोघं एकत्र घालवू लागले.

अर्थात लग्नाआधी महेशबाबूने नम्रतासमोर एक अट ठेवली होती. लग्नानंतर सिनेमात काम करायचं नाही, अशी अट महेशबाबून नम्रतासमोर ठेवली होती.लग्नानंतर नम्रताने सिनेमा सोडून घर सांभाळावं, अशी अट त्याची होती. महेशबाबूवर असलेल्या प्रेमाखातर तिने ही अट मान्य केली.

महेशबाबूनं जशी नम्रतासमोर अट ठेवली होती तशी नम्रतानंही त्याच्यावर एक ठेवली होती. महेश बाबूला तिनं सांगितलं होतं की, मी बंगल्यात राहणार नाही. मला अपार्टमेंटमध्ये राहायचं आहे. त्यामुळं महेश बाबूनं अलिशान असं अपार्टमेंट खरेदी केलं.

दरम्यान, अभिनेता नम्रताशी लग्न करण्याबाबत कुटुंबातील सदस्यांशी बोलण्यास घाबरत होता. कारण त्याला वाटत होते की जर अभिनेत्री आपल्यापेक्षा चार वर्षांनी मोठी असेल तर आई-वडील मान्य करणार नाहीत.

महेश बाबूने सर्वप्रथम आपल्या बहिणीला या नात्याबद्दल कल्पना दिली होती. पण, नंतर जेव्हा त्याच्या आई-वडिलांना या नात्याबद्दल कळले तेव्हा त्यांनी लगेच होकार दिला. यानंतर दोघांनी 2005 मध्ये घरच्यांच्या मान्यतेने लग्न केले.

महेश बाबू आणि नम्रता हे दक्षिणेतील सर्वोत्तम जोडप्यांपैकी एक आहेत, जे आनंदी जीवन जगत आहेत. त्या दोघांना गौतम आणि सितारा ही दोन मुलं झाली. अनेकवेळा दोघे मुलांसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट करतात.