अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय कुटुंबीयांना पसंत नव्हता, क्रिती सॅनानसमोर ठेवली होती फक्त एकच अट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 08:10 PM2024-02-20T20:10:03+5:302024-02-20T20:19:20+5:30

अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय क्रिती सॅनानच्या कुटुंबीयांना पसंत नव्हता.

बाॅलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉन (Kriti Sanon) हिने अनेक चित्रपटांमध्ये हिट भूमिका केल्या. क्रिती सनॉन हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. विशेष म्हणजे क्रिती सनॉन ही सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय दिसते.

नुकतेच क्रितीचा 'तेरी बातो में ऐसा उलझा जिया' हा सिनेमा प्रदर्शित झाला असून तो बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. सिनेमातील शाहिद कपूर आणि क्रितीची जोडी चाहत्यांना पसंत पडली आहे.

क्रितीने आपल्या अभिनय क्षेत्रातील करियरची सुरूवात दाक्षिणात्य चित्रपटांमधून केली. सुपरस्टार महेश बाबूसोबत सायकॉलिजिकल थ्रिलर सिनेमा '१: नेनोक्कदिने' या चित्रपटामधून क्रितीने सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं.

तर 2014 साली प्रदर्शित झालेल्या 'हिरोपंती' या चित्रपटामधून क्रितीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण, फार कमी लोकांना माहित आहे की क्रितीचा अभिनेत्री होण्याचा निर्णय तिच्या कुटुंबीयांना पसंत नव्हता.

क्रितीचा जन्म 27 जुलै 1990 रोजी दिल्ली येथे झाला. तिचे वडिल राहुल सनॉन हे सी. ए आहेत. तर आई गीत या दिल्ली विश्वविद्यालयामध्ये प्रोफेसर आहेत. क्रितीने नोएडामधील कॉलेजमध्ये बी.टेक केले आहे.

अभिनयात करिअर करण्यासाठी क्रितीला खूप मेहनत करावी लागली. कॉलेज पुर्ण करुन पदवी मिळवल्यानंतरच ती अभिनयाचा विचार करु शकेल, अशी अट पालकांनी क्रितीला घातली होती. पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत क्रितीने याचा खुलासा केला होता.

'ऑडिशन देईन आणि GMAT साठी कोचिंग क्लास देखील घेईन', असं वचन कुटुंबीयांना दिलं होतं. तिने दोन महिन्यांचा ब्रेक घेतला आणि परीक्षा देत 710 गुण मिळवले होते. यानंतरही तिने अभिनेत्री होण्याच्या निर्णयावर पुनर्विचार केला आणि केवळ अभिनयावर लक्ष केंद्रित केले.

तिच्या 10 वर्षांच्या दीर्घ कारकिर्दीत, क्रिती आतापर्यंत बहुतेक फ्लॉप चित्रपटांमध्ये दिसली आहे. मात्र सातत्याने फ्लॉप चित्रपट देऊनही अभिनेत्रीची लोकप्रियता कमी झालेली नाही. आजही ती अनेक मोठ्या प्रॉडक्शन हाऊसच्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत दिसते. तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्सही येत आहेत.

क्रिती सॅननच्या कठोर परिश्रमानेच तिला आतापर्यंत इंडस्ट्रीतील टॉप स्टार बनवले आहे. 'मिमी' या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी क्रितीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. चित्रपटातील भुमिकेसाठी तिचं खूप कौतुकही झालं.

फिल्म इंडस्ट्रीची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही अभिनेत्री क्रिती सनॉनने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावून हे सिद्ध केलं की जिद्द आणि मेहनत केल्यास सर्वकाही सिद्ध होऊ शकतं.