Johnny Walker Birthday Special : दारुच्या थेंबालाही न शिवणाऱ्या ‘बदरुद्दीन’ला ‘जॉनी वॉकर’ हे व्हिस्की ब्रँडचं नाव कसं मिळालं?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 08:00 AM2021-11-11T08:00:00+5:302021-11-11T08:00:12+5:30

Johnny Walker Birthday Special : अभिनेते जॉनी वाॅॅकर यांचा आज वाढदिवस.. जॉनी भाईंनी त्यांच्या कारकिर्दीत असंख्य चित्रपटात दारुड्याच्या भूमिका केल्या पण दारुच्या थेंबालाही शिवले नाहीत...

अभिनेते जॉनी वॉकर यांनी लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यांचा खट्याळ चेहरा पडद्यावर दिसताच प्रेक्षकांच्या चेह-यावर हास्य फुलायचं. 1926 साली आजच्या दिवशीच म्हणजे 11 नोव्हेंबरला त्यांचा जन्म झाला होता.

जॉनी वॉकर यांनी पडद्यावर दारुड्याच्याअनेक भूमिका साकारल्या. पण ख-या आयुष्यात जॉनी वॉकर यांनी दारूला कधी स्पर्शही केला नव्हता, हे वाचून कदाचित तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

विशेष म्हणजे, दारूला स्पर्शही न करणा-या या अवलियाला एका लोकप्रिय Scotch Whiskyच्या नावावरून ‘जॉनी वॉकर’ हे नाव दिलं गेलं होतं.

जॉनी वॉकर यांचे खरं नाव बदरुद्दीन जमालुद्दीन काजी होतं. मात्र बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर त्यांनी जॉनी वॉकर असं नवं नाव धारण केलं होतं. गुरूदत्त यांनी हे नाव त्यांना दिलं होतं.

जॉनी वॉकर यांचे वडील इंदूरमध्ये एका मिलमध्ये नोकरी करायचे. पण ही मिल बंद झाली आणि 1942 मध्ये त्यांचे अख्खे कुटुंब मुंबईला आले. त्यांच्या कुटुंबात एकूण 15 जण होते. कुटुंबाचा गाडा ओढणं वडिलांना कठीण झालं आणि त्यांच्या मदतीसाठी जॉनी वॉकर यांनी बस कंडक्टरची नोकरी धरली. त्यावेळी ते 27 वर्षांचे होते.

बस कंडक्टरची नोकरी मिळाल्याने जॉनी वॉकर खूश होते. याचे कारण म्हणजे, यानिमित्ताने त्यांना मुंबईभर फिरता येईल. अर्थात ही नोकरी करतानासुद्धा त्यांच्यातील विनोदबुद्धी त्यांना शांत बसू द्यायची नाही. बसमधील प्रवाशांना अनेक किस्से सांगून ते त्यांना हसवत.

एकदिवस गुरुदत्त यांच्या ‘बाजी’ या चित्रपटासाठी पटकथा लिहिणारे बलराज साहनी यांची नजर बदरुद्दीन यांच्यावर पडली. साहनी यांनी त्यांची भेट गुरुदत्त यांच्याशी करून दिली. या भेटीत गुरूदत्त यांनी बदरूद्दीन यांना दारूड्याचा अभिनय करण्यास सांगितला. बदरूद्दीन यांचा अभिनय पाहून गुरूदत्त इतके प्रभावित झाले की, लगेच त्यांना ‘बाजी’मध्ये रोल मिळाला.

गुरूदत्त यांनी बदरूद्दीना केवळ ‘बाजी’मध्ये रोल दिला नाही तर त्यांच्या आवडत्या व्हिस्कीच्या ब्रँडवरून ‘जॉनी वॉकर’ हे नावही दिलं.

‘आखिरी पैमाने’ या चित्रपटात त्यांना छोटीशी भूमिका मिळाली. या भूमिकेसाठी जॉनी वॉकर यांना मानधनरूपात 80 रुपये मिळाले. हे 80 रुपए पाहून जॉनी वॉकर अवाक् झाले होते. कारण बस कंडक्टर म्हणून महिनाभर नोकरी केल्यावर त्यांना पगारापोटी केवळ 26 रुपये मिळायचे.

जॉनी वॉकर यांच्यावर चित्रीत करण्यात आलेल सर जो तेरा चकराये... हे गाणे त्याकाळात प्रचंड गाजले होते. आज या गाण्याला अनेक वर्षं झाले असले तरी या गाण्याची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाही. विनोदाला एका उंचीवर नेणाºया या हरहुन्नरी अभिनेत्याचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन झालं. 29 जानेवारी 2003 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read in English