रंगामुळे हिणवलं, कास्टिंग काऊचची झाली शिकार; 'त्या 'एका सिनेमामुळे चमकलं तिचं नशीब, कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 15:09 IST2025-11-28T14:54:40+5:302025-11-28T15:09:39+5:30

अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही हिंदी सिनेसृष्टीत आपलं हक्काचं स्थान निर्माण करणाऱ्या नायिकांपैकी एक म्हणजे ईशा गुप्ता.

२०१२ मध्ये जन्नत २ चित्रपटातून तिने इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. तसेच आश्रम या बहुचर्चित वेब सीरिजमध्ये तिने केलेल्या कामाचंही तितकंच कौतुक झालं.आज या अभिनेत्रीचा वाढदिवस आहे.

मुळची दिल्ली असलेल्या ईशाचं शेफ बनण्याचं स्वप्न होतं.गेली १३ वर्षे बॉलिवूडमध्ये सक्रिय असलेल्या ईशा गुप्ताने २००७ मध्ये मिस इंडिया इंटरनॅशनलचा किताब जिंकला होता.

त्यानंतर तिने अभिनय क्षेत्राची वाट धरली. ईशाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की मॉडेलिंगनंतर चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी तिने अनुपम खेर यांच्या अॅक्टिंग अकॅडमीमध्ये २ महिन्यांचा कोर्स केला होता. त्यानंतर ती ऑडिशन देण्यासाठी गेली.

'जन्नत २' नंतर, ईशासाठी चित्रपटसृष्टीचे दरवाजे उघडले. तिने २०१२ मध्ये 'राज ३डी' आणि 'चक्रव्यूह'मध्येही काम केले. "राज ३डी" हा एक हॉरर चित्रपट होता, तर "चक्रव्यूह" मध्ये तिने नकारात्मक भूमिका साकारली होती.

एका मुलाखतीत ईशा गुप्ताने म्हटलेलं की, तिला बॉलिवूडमध्ये खूप भेदभावाचा सामना करावा लागला. तिची बहीण गोरी आहे तर ती गव्हाळ रंगाची आहे. यामुळे तिने इंडस्ट्रीमध्ये तसेच कुटुंबातही भेदभाव सहन केला होता.

आणखी एक घटना सांगताना ईशा म्हणाली,'एकदा आम्ही शूटिंगनिमित्त आऊटडोरला गेलो होतो. २ लोकांनी कास्टिंग काऊचचा प्लॅन केला होता. मी हे आधीच समजले होते. पण तरी मी सिनेमा करत होते.

पुढे ती म्हणाली, "त्यांना वाटलं आऊटडोर शूटला ते मला जाळ्यात ओढतील. पण मी सुद्धा हुशार आहे, मी तिथे रात्री एकटी झोपणार नाही असं सांगितलं. मी माझ्या फिमेल मेकअप आर्टिस्टला माझ्या खोलीत झोपायला बोलावलं."