Dilip Kumar Death : जेव्हा दिलीप कुमार भर कोर्टात सर्वांसमोर म्हणाले होते, 'माझं मधुबालावर प्रेम आहे'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 12:34 PM2021-07-07T12:34:16+5:302021-07-07T12:49:58+5:30

Dilip Kumar and Madhubala Love story : मधुबाला आणि दिलीप कुमार यांची लव्हस्टोरी १९५१ मध्ये आलेल्या 'तराना' सिनेमाच्या सेटवर सुरू झाली होती. दोघांच्या नजरा एक झाल्या आणि दोघेही पहिल्या नजरेत प्रेमात पडले.

बॉलिवूडचे ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार (Dilip Kumar Death) यांचं वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते आणि चेकअपसाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर बॉलिवूड कलाकारांसह त्यांच्या फॅन्सवर मोठी शोककळा पसरली आहे.

त्यांच्या निधनानंतर त्यांच्या वेगवेगळ्या आठवणी ताज्या होत आहेत. दिलीप कुमार (Dilip Kumar) आणि मधुबाला(Madhubala) यांच्या बॉंडिंगची चर्चा आजही केली जाते. याचं कारण दोघांमधील प्रेम. भलेही त्यांच्या प्रेमाचा अंत चांगला झाला नाही, पण त्यांच्या नात्याच्या काही चांगल्या-वाईट आठवणी आहेतच.

मधुबाला आणि दिलीप कुमार यांची लव्हस्टोरी १९५१ मध्ये आलेल्या 'तराना' सिनेमाच्या सेटवर सुरू झाली होती. दोघांच्या नजरा एक झाल्या आणि दोघेही पहिल्या नजरेत प्रेमात पडले.

मधुबालाने प्रेम व्यक्त करण्यासाठी दिलीप कुमार यांच्या मेकअप रूममध्ये एक चिठ्ठी आणि गुलाबांच फूल पाठवलं होतं. या पत्रात लिहिलं होतं की, 'जर तुमचं माझ्यावर प्रेम असेल तर हा गुलाब स्वीकार करा'.

दिलीप कुमार यांनीही मधुबालाचं प्रेम स्वीकारलं होतं. नंतर दिलीप कुमार मधुबालाच्या प्रेमात इतके हरवले होते की, आपलं शूटींग सोडून ते मधुबालाच्या शूटींग सेटवर जात होते.

दोघांच्या प्रेमात मिठाचा खडा तेव्हा पडला जेव्हा या कहाणीत मधुबालाचे वडील अताउल्ला खान यांची एन्ट्री झाली. खान आपल्या मुलीवर बारीक लक्ष ठेवून असत. इतकंच काय तर त्यांच्या लुडबुडीमुळे दिग्दर्शकही परेशान होते.

वाद तेव्हा पेटला जेव्हा बीआर चोप्रा मधुबाला आणि दिलीप कुमार यांच्यासोबत 'नया दौर' सिनेमाचं शूटींग करत होते. त्यांना भोपाळजवळ आउटडोर शूटींग करायचं होतं.

पण अताउल्ला खान यासाठी तयार नव्हते. याचं कारण हे मानलं गेलं की, खान मधुबाला आणि दिलीप कुमार यांच्या रोमान्सच्या भीतीने आउटडोर शूटींगसाठी तयार झाले नव्हते.

चोप्रा यांनी मधुबालाच्या जागी वैजयंतीमालाला साइन केलं आणि मधुबालाचा कट मारलेला फोटो वृत्तपत्रात छापला. त्याच्याच बाजूला वैजयंतीमालाचा एक फोटो होता. त्यानंतर खान यांनीही असंच काहीसं करत एक फोटो वृत्तपत्रात छापला होता.

वाद इतका वाढला की, कोर्टापर्यंत पोहोचला. नंतर सुनावणी दरम्यान दिलीप कुमार म्हणाले होते की, 'माझं मधुवर प्रेम आहे आणि प्रेम करत राहणार'. मात्र, दोघांच्या नात्यातील चढ-उतार सुरूच होते.

एक दिवस असा आला की, दोघांची प्रेम कहाणी पुढे जाऊ शकली नाही. दोघांनी नतंर मुघल-ए-आझम सिनेमाचं शूटींग करत राहिले, पण एकमेकांसोबत बोलत नव्हते. नंतर दिलीप कुमार यांनी सायरा बानू यांच्यासोबत लग्न केलं.

Read in English