मायकल जॅक्सनचा जबरा फॅन! मुंबईत स्टेशनवर राहून काढले दिवस; टॅलेंटची जगाने घेतली दखल, बनला प्रसिद्ध नृत्य-दिग्दर्शक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 16:47 IST2026-04-02T16:26:00+5:302026-04-02T16:47:55+5:30

जिद्द आणि चिकाटी मनात असली तर माणूस असाध्य ते साध्य करु शकतो. याचे हिंदी चित्रपटसृष्टीतील जिवंत उदाहरण म्हणजे नृत्य दिग्दर्शक रेमो डिझुजा. आज २ एप्रिल रेमोचा वाढदिवस आहे.

रेमो डिसूझाचा जन्म २ एप्रिल १९७२ रोजी बंगळुरू, कर्नाटक येथे झाला. त्याच्या वडिलांचे नाव गोपी नायर असून ते नौदलात अधिकारी होते. तर आईचे नाव माधवीअम्मा होते.रेमोचे वडिलांच्या नौदलातील नोकरीमुळे रेमोचे शिक्षण भारतातील अनेक भागात झाले.

रेमो डिसूझाने कधीही नृत्याचं प्रशिक्षण घेतलं नाही. तो मायकल जॅक्सनचा मोठा चाहता आहे. त्यांचे डान्स व्हिडीओ पाहूनच तो डान्स शिकला. लहानपणापासून तो मायकलच्या डान्स मूव्ह्ज पाहायचा आणि त्यात स्वतःच्या स्टेप्स कोरिओग्राफ करायचा.

रेमो बारावीत असताना तेव्हा त्याच्या एका मित्राने मुंबईत काही कलाकारांची आवश्यकता असल्याच्या एका जाहिरातीबद्दल सांगितले. त्यावेळी तो आपलं शिक्षण सोडून मुंबईला स्वप्न पूर्ण करण्यासाठी निघून आला. त्याच्या या निर्णयाला पालकांचा विरोध होता. पण, नंतर त्यांनी त्याला मुंबईत पाठवलं.

त्यावेळी रेमोच्या खिशात अवघे २६०० रुपये घेऊन मुंबईत आला. जाहिरातीसाठी कलाकारांची मागणी असलेल्या ठिकाणी तो पोहोचल्यावर त्याच्याकडून पैसे घेण्यात आले आणि पुढच्या आठवड्यात ये... म्हणून त्याला सांगितलं. पण तो जेव्हा तिथे पोहोचला तेव्हा तिथे ती कंपनी अस्तित्वातच नव्हती. ती कंपनी फ्रॉड निघाली.

तेव्हा ना त्याच्याकडे पैसे होते ना कोणते काम ज्याद्वारे तो काही पैसे कमवू शकतो. पण तेव्हा रेमोला एका कुटुंबाने आधार दिला.त्या कुटुंबाने त्यांच्या घरी त्याला राहण्याची परवानगी दिली.

त्यानंतर रेमोने चर्नी रोडवर डान्स ब्रॅट्स नावाचा डान्स क्लास सुरू केला होता.लगेचच आणखी तीन मित्रांच्या मदतीने त्याने अंधेरी आणि बोरिवली येथे डान्स क्लास सुरू केला. तो सकाळी चर्नी रोडला, दुपारी बोरिवलीला क्लास घ्यायचा आणि नंतर ट्रेन पकडायचा आणि संध्याकाळी घरी जाण्यापूर्वी अंधेरीला नृत्य शिकवायचा. त्याकाळात त्याच्याकडे पैशांची इतकी कमतरता होती की त्याला दोन रात्र स्टेशनवर काहीही न खाता पिता काढावे लागले. पण त्याने अखेरपर्यंत जिद्द न सोडता झुंज सुरु ठेवली.

दरम्यान, मुंबईत आयोजित एका नृत्यस्पर्धेत रेमोच्या डान्स टीमने सहभाग घेतला आणि या स्पर्धेत रेमोच्या टीमने बाजी मारली. या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांचे टॅलेंट अनेकांपर्यंत पोहचले आणि रेमोचे नशीब चमकले, त्याला आमिर खान आणि उर्मिला मातोंडकर यांच्या रंगीला चित्रपटातून डान्सर म्हणून पहिली संधी मिळाली. या चित्रपटातील त्याच्या नृत्याची दखल घेतली गेली.

त्याने स्वतंत्ररित्या नृत्य दिग्दर्शन करण्याचा निर्णय घेतला आणि अभिनव सिन्हा यांच्या दिग्दर्शनाखाली सोनू निगमचा दिवाना हा अल्बम कोरिओग्राफ केला, हा अल्बम खूप हिट झाला, त्यानंतर अनेक मोठ्या दिग्दर्शकांसह व्हिडिओ अल्बम तयार केले. त्याच्या कारकिर्दीचा टर्निंग पॉइंट म्हणजे कांटे चित्रपटातील इश्क समंदर हे आयटम साँग, त्या काळात खूप गाजले आणि त्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकांनी रेमोची नृत्यदिग्दर्शन क्षमता ओळखली.

रेमो डिसूझा हा मोठ्या पडद्यावर यशस्वी कोरिओग्राफर ठरला तेवढाच तो छोट्या पडद्यावरही यशस्वी परीक्षक म्हणून ओळखला जातो.रेमोला त्याच्या उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यापैकी आयफा अवॉर्ड्स, झी सिने अवॉर्ड्स आणि स्टार डस्ट अवॉर्ड्स त्याच्या नावे आहेत.वैयक्तिक जीवनात रेमोने कॉस्च्युम डिझायनर असलेल्या लिझेलशी विवाह केला असून, त्यांना ध्रुव आणि गॅबरील ही दोन मुले आहेत. पत्नी लिझेलने रेमोचे व्यावसायिक करिअर सावरण्यासाठी खूप मदत केली आहे.