महेश भट यांनी हाकूलन लावले पण आशुतोष राणा हरला नाही, आज आहे कोट्यवधींचा मालक

By रूपाली मुधोळकर | Published: November 10, 2020 12:48 PM2020-11-10T12:48:09+5:302020-11-10T13:03:24+5:30

बॉलिवूडचा गुणी अभिनेता म्हणजे आशुतोष राणा. ‘स्वाभिमान’ या मालिकेपासून करिअरची सुरुवात करणा-या आशुतोषचा आज वाढदिवस.

बॉलिवूडचा गुणी अभिनेता म्हणजे आशुतोष राणा. ‘स्वाभिमान’ या मालिकेपासून करिअरची सुरुवात करणा-या आशुतोषचा आज वाढदिवस.

छोट्या पडद्यावरून आशुतोष चित्रपटात आला आणि आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर सर्वांचा लाडका झाला. जख्म, संघर्ष, दुश्मन अशा अनेक चित्रपटातील त्याची शानदार अदाकारी प्रेक्षकांना प्रचंड भावली.

‘संघर्ष’ या चित्रपटात त्याने साकारलेली सायको किलरची भूमिका असो किंवा ‘शबनम मौसी’ या चित्रपटातील किन्नरची भूमिका आशुतोषने प्रत्येक भूमिकेत अक्षरश: जीव ओतला. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही.

अभिनेता, कवी, निर्माता, अँकर अशी आशुतोषची ओळख आहे. या प्रत्येक रूपात आशुतोषने स्वत: सिद्ध केले आहे.

रिपोर्टनुसार, आशुतोष 47 कोटी रूपयांच्या संपत्तीचा मालक आहे. मध्यप्रदेशच्या गाडरवारा येथे त्याचे एक अलिशान घर आहे. या घराची किंमत 3 कोटी रूपये आहे.

याशिवाय अनेक शहरात त्याची मालमत्ता आहे. त्याच्याकडे अनेक लक्झरी गाड्यांचे कलेक्शन आहे. यात बीएमडब्ल्यू एक्स 1, मित्सुबिशी पजेरो अशा गाड्यांचा समावेश आहे.

आशुतोष एका सिनेमासाठी 3 ते 5 कोटी रूपये फी घेतो. एका जाहिरातीसाठी सुमारे 1 कोटी रूपये घेतो. रिअल इस्टेटमध्ये त्याची मोठी गुंतवणूक आहे.

आशुतोषने अभिनेत्री रेणुका शहाणेसोबत लग्न केले. या दोघांची लव्हस्टोरी चांगलीच फिल्मी आहे. हंसल मेहताच्या एका सिनेमादरम्यान दोघांची पहिली भेट झाली होती. रेणुकाला एका कवितेद्वारे त्याने प्रपोज केले होते.

ही कविता ऐकून रेणुकाने थेट आशुतोषला आय लव्ह यू म्हटले. तिच्या तोंडून आय लव्ह यू ऐकून आशुतोष अक्षरश: वेडा झाला होता. मात्र भेटून बोलू असे म्हणत त्याने त्याक्षणी संयम राखला होता.

पुढे आशुतोष व रेणुकाने लग्नाचा निर्णय घेतला. त्यांच्या लग्नाची देखील एक गंमतीदार आठवण आहे. आशुतोष हा मुळचा मध्यप्रदेशचा आहे. मध्यप्रदेश मधील त्याच्या गावात त्यांचे लग्न झाले. रेणुका लग्नासाठी ट्रेनने गेली होती. त्यावेळी स्टेशनवर घ्यायला तिला कमीत कमी दीड हजार लोक तिथे आले होते. त्यांच्या लग्नाला तर इतकी गर्दी होती की, या गदीर्मुळे रेणुकाचे आई वडील लग्नाच्या ठिकाणापर्यंत देखील पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे ऐनवेळी तिचे कन्यादान तिच्या नणंदेने केले.

करिअरच्या सुरूवातीला याच आशुतोषला महेश भट यांनी सेटवरून हाकलून लावले होते. आशुतोष राणा त्यावेळी स्ट्रगल करत होता. एकदा तो महेश भट यांना सेटवर भेटायला गेला. त्याने महेश भट समोर दिसताच त्याने त्यांना वाकून नमस्कार केला. पण आशुतोषच्या या वागण्याने महेश भट इतके संतापले की त्यांनी आशुतोषला सेटवरून अक्षरश: हाकलून लावले. याचे कारण म्हणजे, महेश भट यांना कुणीही त्यांच्या पाया पडलेले आवडायचे नाही.

इतकी अपमानास्पद वागणूक मिळूनही आशुतोषने हिंमत सोडली नाही. तो वारंवार सेटवर गेला आणि प्रत्येकवेळी त्याने महेश भट यांना वाकून नमस्कार केला. महेश भट प्रत्येकवेळी संतापले. अखेर एक दिवस, मी इतका संतापतो तरीही तू माझ्या पाया का पडतोस? असे महेश भट यांनी आशुतोषला रागात विचारले. यावर आशुतोषने काय उत्तर द्यावे?

मोठ्या व्यक्तिंना चरणस्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेणे, माझ्यावरचा संस्कार आहे. तो मी सोडू शकत नाही, असे उत्तर आशुतोषने दिले. त्याचे हे उत्तर ऐकून महेश भट यांनी त्याला अलिंगण दिले. सोबत ‘स्वाभिमान’या मालिकेत त्याला रोलही दिला. पुढे महेश भट यांच्या अनेक चित्रपटांत आशुतोषने काम केले.